‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या सद्यस्थितीकडे लक्ष द्या : शशी थरुर


नवी दिल्ली : सध्या देशात बॉलिवूड सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’ चित्रपटावरुन मोठा वाद सुरु असून चित्रपटाविरोधात अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून आंदोलने सुरु असल्यामुळे बॉलिवूड भन्साळीच्या समर्थनार्थ उतरले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ‘पद्मावती’ चित्रपटापेक्षा राजस्थानातील महिलांच्या सद्यस्थितीकडे लक्ष द्या असे ट्वीट करुन म्हटले आहे.

आपल्या ट्वीटमध्ये शशी थरुर यांनी राजस्थानातील महिलांच्या सद्यस्थितीवर पद्मावती चित्रपटाबद्दलच्या वादामुळे लक्ष केंद्रीत करण्याची संधी आहे, ना की सहाव्या शतकातील महाराण्यांच्या स्थितीवर लक्ष केंद्रीत करण्याची. राजस्थानातील महिला साक्षरतेचे प्रमाण अतिशय कमी असून महिलांच्या डोक्यावर पदर असण्याच्या बंधनापेक्षा शिक्षण अतिशय गरजेचे आहे.

चित्रपट १ डिसेंबर रोजी संजय लीला भन्साळीचा पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सुरुवातीपासूनच या चित्रपटाच्या विषयाला विरोध होत आहे. विशेष करुन, राजपूत समाजाचा दावा आहे की, इतिहासासोबत चित्रपटामध्ये छेडछाड होत असून, चुकीच्या पद्धतीने महाराणी पद्मावतींची व्यक्तीरेखा चित्रित केली जात आहे. पण राजपूत समाजाचा दावा दिग्दर्शक संजय लीला भन्साळीने फेटाळला आहे.