Skip links

पंकजांकडून १५ काेटी घेत भाजपला सुरेश धसांनी विकले पाच सदस्य


आष्टी- पंकजा मुंडे यांच्याकडून १५ कोटी रुपये घेऊन अापल्या गटाचे पाच सदस्य ‘बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेश धस यांनी भाजपला विकले, असा अाराेप राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आष्टीत केला.

साेमवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंडे व पवारांनी यानिमित्त अायाेजित शेतकरी मेळाव्यात भाजपवर टीका केली. दरम्यान, धास यांनी खाेटे अाराेप करणाऱ्या धनंजय मुंडेंविराेधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. तर धनंजय यांनी भाजपशी गद्दारी करून राष्ट्रवादीत जाताना किती काेटी घेतले हाेते, असा पलटवार मंत्री पंकजा मुंडे यांनी केला अाहे.

दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे सर्व आरोप सुरेश धस यांनी फेटाळले आहेत. प्रत्येक प्रकरणात तोडपाणी करणाऱ्या धनंजय मुंडेंना काविळ झाल्यामुळे सर्व जगच पिवळे दिसत आहे, असेही सुरेश धस म्हणाले. आपल्यावर धनंजय मुंडेंनी खोटा आरोप केल्यामुळे त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही ते म्हणाले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यावरील कर्जात भाजप सरकारच्या काळात तीन वर्षात दीड पटीने वाढ झाली आहे. केवळ बनवाबनवी हे सरकार करत असून यांच्याच काळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या व कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आहे. आमचे सरकार असताना खुनाचा गुन्हा नोंदवा म्हणणाऱ्यांवर आता खुनाचा गुन्हा नोंदवायला हवा.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला नाही. कोणताच वर्ग या सरकारच्या काळात समाधानी नसून शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, एसटी कर्मचारी, शेतकरी सर्वच नाराज आहेत. केवळ अच्छे दिनाचे दिवा स्वप्न दाखवून केवळ जाहिरातींवर खर्च सुरु आहे. जनसामान्यांच्या मनात सरकारबद्दल चिड असून येणाऱ्या काळात हे सरकार पायउतार झाल्याशिवाय राहणार नाही, असेही पवार म्हणाले.

Web Title: Five members selling Suresh Dhas to BJP, taking 15 crore from Pankaja