सैफी बुऱ्हानी विकास ट्रस्टने घेतल्या दाऊदच्या तिन्ही मालमत्ता


मुंबई : सैफी बुऱ्हानी विकास ट्रस्टने दाऊदच्या तिन्ही मालमत्ता लिलावात खरेदी केल्या आहेत. एकूण ९ कोटींना या मालमत्ता विकल्या गेल्या. सैफी बुऱ्हानी विकास ट्रस्ट या मालमत्तांच्याद्वारे भेंडी बाजार परिसराचा पुनर्विकास करणार आहे. दाऊद कोट्यावधी रुपयांची संपत्ती सोडून भारतातून पळून गेला. तस्करी आणि परकीय चलन हाताळणी अधिनियम १९७६ अंतर्गत दाऊदशी संबंधीत असलेली देशभरातील संपत्ती जप्त करण्यात आली होती. या संपत्तीचा त्यानंतर लिलाव करण्याचा निर्णय सरकारने घेतला. दाऊदच्या संपत्तीचा याआधीही दोन वेळा लिलाव करण्यात आला आहे.

दाऊदची लिलाव केलेली संपत्ती :- हॉटेल दिल्ली जायकाची किंमत १ कोटी १८ लाख ६३ हजार रुपये ऐवढी ठेवण्यात आली होती, तर त्यासाठी २३ लाख ७२ हजार ८०० अमानत रक्कम होती. त्याचबरोबर डामरवाला बिल्डिंगमधील फ्लॅट नंबर १८ ते २०, २५, २६ आणि २६ साठी १ कोटी ५५ लाख ७६ हजार रुपये ऐवढी ठेवण्यात आली होती, तर त्यासाठी ६२ लाख ३० हजार ४०० अमानत रक्कम होती. तर शबनम गेस्ट हाऊससाठी १ कोटी २१ लाख ४३ हजार रुपये ऐवढी ठेवण्यात आली होती, तर त्यासाठी ४८ लाख ५७ हजार २०० अमानत रक्कम होती.