भुज ते हाईती; या शतकातील सर्वात भीषण भूकंप


इराणमध्ये नुकत्याच झालेल्या ७.३ तीव्रतेच्या भूकंपामध्ये १२० पेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. याच भूकंपाचा धक्का इराकमध्ये ही जाणवला. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली, त्याचबरोबर मालमत्तेचे देखील पुष्कळ नुकसान झाले. भूकंपानंतर वीज पुरवठा खंडित झाल्याने भूकंपाचे आणखी झटके जाणवू शकतील या भीतीने रस्त्यांवर आणि अनेक पार्क्स मध्ये आश्रयाला आलेल्या लोकांना भयानक थंडीचा सामना करावा लागला. जगभरामध्ये आजवर या पूर्वी असे अनेक भूकंप होऊन गेले, ज्यामुळे शहरे च्या शहरे संपूर्णपणे उध्वस्त झाली. मालमत्तेचे आणि जीविताचे अपार नुकसान झाले. या शतकामध्ये घडून गेलेल्या अशाच भीषण भूकंपाच्या घटनांबद्दल थोडेसे.

२००१ साली २६ जानेवारी रोजी भारतामधील गुजरात राज्यामध्ये भयानक भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ७.७ असून, सुमारे दोन मिनिटे ह्या भूकंपाचे हादरे जाणवत राहिले. ह्या भूकंपाचा उल्लेख ‘ भुज अर्थक्वेक’ असा केला जातो, कारण या भूकंपाचा केंद्रबिंदू भुजजवळील अंजार येथे होता. या भीषण भूकंपामध्ये ३०,००० लोकांचे प्राण गेले, तर ४००,००० हून अधिक घरे उध्वस्त झाली.

२६ डिसेंबर २००३ साली इराण देशातील बाम शहरामध्ये ६.६ तीव्रतेचा भूकंप झाला. ह्या भूकंपाचे हादरे बाम शहराच्या आसपासच्या प्रांतांमध्येही जाणविले. हा भूकंप पहाटे साडेपाचच्या सुमाराला झाला, जेव्हा बहुतेक लोक निद्राधीन होते. तसेच बाम शहरामध्ये नैसर्गिक आपदांचा सामना करण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा अस्तित्वात नसल्याने ह्या भूकंपाची तीव्रता मध्यम पातळीची असूनही या भूकंपामुळे अपार जीवितहानी झाली आणि मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बाम शहरामधील ९० टक्के इमारती या भूकंपामुळे जमीनदोस्त झाल्या.

२६ डिसेंबर २००४ रोजी इंडोनेशियामधील सुमात्रा बेट स्थित असलेल्या समुद्राच्या तळाशी ९.१ तीव्रतेचा जबरदस्त भूकंप झाला. परिणामस्वरूप या भूकंपानंतर जवळ जवळ पुढचे सात तास आलेल्या प्रचंड समुद्री लाटांमुळे ( सुनामी )दूर-दूर प्रातांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. या भूकंपामुळे इंडोनेशिया, श्रीलंका, भारत, मालदिव्ज, थायलंड इत्यादी देशांमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या सर्व देशांमध्ये मिळून सुमारे २२५,००० लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

८ ऑक्टोबर २००५ साली पाकिस्तान व्याप्त काश्मीर प्रांतामध्ये सकाळी साडेआठच्या सुमाराला ७.६ तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला. ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू मुजफ्फराबाद शहराच्या नजीक होता. या भूकंपामध्ये पाकिस्तानातील खैबर पख्तुन्ख्वा प्रांतामध्ये आणि भारतातील जम्मू काश्मीर राज्यामध्ये जीवितहानी झाली आणि मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या वेळी आपदेच्या वेळी मदतकार्य करणारी यंत्रणा ठप्प झाल्याने जीवितहानी जास्त प्रमाणात झाली.

२७ मे २००६च्या सकाळी इंडोनेशियातील जावामधील योग्यकर्ता मध्ये झालेल्या भूकंपामध्ये इमारती, पूल, रस्ते यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भूकंपामध्ये सुमारे सात हजार लोकांना प्राणांना मुकावे लागले. ह्या भूकंपाचे वैशिष्ट्य असे, की ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनींच्या स्तराखाली सुमारे दहा किलोमीटर इतक्या खोलीवर होता.

वेन्चुआन भूकंप म्हणून ओळखला जाणारा हा भूकंप चीन देशामध्ये १२ मे २००८ रोजी झाला. या भूकंपाचा प्रभाव सिचुआन प्रांतातील डोंगराळ भागामध्ये सर्वात जास्त प्रमाणात पहावयास मिळाला. दुजीयांगान शहराच्या नजीक या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाच्या परिणामस्वरूप सुमारे ९०,००० लोकांचे प्राण गेले. याशिवाय असंख्य लोक बेपत्ता झाले. या भूकंपाचे झटके कितीतरी महिने उलटून गेल्यानंतरही जाणवत होते.

१२ जानेवारी २०१० साली हाईती प्रांतामध्ये ७.० तीव्रतेचा भूकंप संध्याकाळी पाचच्या सुमाराला झाला. या भूकंपाचा केंद्र बिंदू हाईतीची राजधानी पोर्ट-ऑ-प्रिन्स पासु सुमारे २५ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपामध्ये १००,००० पेक्षा अधिक लोकांचे प्राण गेले. या भूकंपाचे हादरे ( आफ्टर शॉक्स ) कित्येक दिवसांनंतर देखील जाणवत राहिले.

२५ एप्रिल २०१५ या दिवशी नेपाळमध्ये आलेल्या ७.८ तीव्रतेच्या भूकंपामध्ये ९०,००० लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या भूकंपानंतर आलेले झटके देखील ६.६ व ६.७ तीव्रतेचे होते. हे झटके जवळजवळ लागोपाठच आल्याने संपूर्ण देशभरामध्ये भीतीचे वातावरण होते. १२ मी रोजी आणखी एक भूकंप काठमांडू येथे झाला. या भूकंपाची तीव्रता ७.३ होती. या भूकंपामध्ये काठमांडू आणि त्याच्या जवळपासच्या प्रांतांमध्ये मिळून ६००,००० हूनही अधिक इमारतींचे नुकसान झाले. ह्या भूकंपाचे झटके उत्तर आणि मध्य नेपाळ, उत्तर भारत, उत्तरपश्चिम बांगलादेश इत्यादी प्रातांमध्ये जाणविला.

८ सप्टेंबर रोजी मेक्सिकोमध्ये झालेला भूकंप ८.१ तीव्रतेचा होता. हा भूकंप मेक्सिकोच्या दक्षिणी किनारपट्टी जवळ जाणविला. या भूकंपामुळे समुद्रातून प्रचंड उंचीच्या लाटाही उसळल्या, तसेच अनेक इमारतींना तडे गेले. या भूकंपानंतर मध्य मेक्सिको प्रांतामध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप आला. या भूकंपामध्ये ३३८ लोकांना आपले प्राण गमवावे लागले.