अमेरिकी महाविद्यालयांना विद्यार्थी न येण्याची भीती


अमेरिकेती शिक्षण संस्था जगभरात अत्यंत लोकप्रिय आहेत. मात्र देशातील बदलत्या राजकीय वातावरणामुळे परदेशी विद्यार्थ्यांची संख्या घटण्याची भीती अमेरिकी महाविद्यालयांना भेडसावत आहे.

अमेरिकेत झालेल्या एका सर्वेक्षणातून नुकतीच ही बाब उघडकीस आली आहे. देशातील वातावरणामुळे येत्या काळात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते, अशी भीती या कॉलेजना वाटत आहे. दि इंस्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन या संस्थेने ही पाहणी केली. या वर्षी परदेशातून येणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत सुमारे सात टक्के घट झाल्याचे संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.

या सर्वेक्षणात 500 हून अधिक कॉलेज आणि विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील 45 टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे मान्य केले आहे, तर 24 टक्के संस्थांनी कुठलाही फरक न झाल्याचे म्हटले आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांच्या प्रवाशांवर अमेरिकेत प्रवेश करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अनेक परदेशी विद्यार्थ्यांच्या मनात शंकेचे वातावरण आहे. आतापर्यंत सुमारे 20 टक्के विद्यार्थी या कारणामुळे देश सोडून गेल्याचेही या सर्वेक्षणात दिसले आहे.