राजस्थानी संस्कृती व कलेचा अनोखा संगम असलेले झालवाड


राजस्थान हे राज्य मूळातच तेथील संस्कृती, कला, इतिहासमुळे देशात प्रसिद्ध आहे. संस्कृती व कलेचा अनोखा संगम असलेले, सुंदर सरोवरे, किल्ले व मंदिरांनी सजलेले झालावाड हे पर्यटकांचे आवडते स्थळ नसले तरच विशेष म्हणायला हवे. झालावाड व झालरापाटण अशी ही सुंदर जुळी शहरे देश विदेशातील पर्यटकांना आकर्षून घेण्यात यशस्वी ठरली आहेत. माळवा पठाराच्या एका टोकावर ही दोन्ही स्थळे आहेत. १८ व्या शतकाच्या शेवटी झाला राजपूत वंशियांनी ही शहरे वसविली असे सांगितले जाते.

झालावाड मधील गढी महाल अतिशय भव्य असून त्याला तीन कलात्मक दरवाजे आहेत. दर्शनी बाजू चार मजली असून मेहरपी, घुमट व राजस्थानी झरोखे हे यांचे वैशिष्ठ. तेथेच एक संग्रहालयही आहे. १८३८ साली राजा राणामदनसिंग यांनी या महालाचे बांधकाम सुरू केले होते व राजा पृथ्वीराज यांच्या काळात ते पूर्ण झाले. १९२१ साली राजा भवानी याने याच परिसरात नाट्यशाळा बांधली.


येथून ६ किमी अंतरावर कृष्णसागर हे सरोवर असून हे शांत, सुंदर सरोवर एकांताची आवड असणार्‍या पर्यटकांत लोकप्रिय आहे. याच ठिकाणी रैन बसेरा नावाची एक लाकडी इमारत आहे. राजा येथे उन्हाळ्यात वास्तव्यासाठी येत असत. पक्ष्यांची आवड असलेल्या पक्षीप्रेमींसाठी हे ठिकाण अतिशय योग्य म्हणता येईल कालीसिंध व आहु या नद्यांच्या संगमावर गागरन फोर्ट हा ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला आहे. याच्या प्रवेशद्वाराजवळ सूफी संत मीठशाह यांचा दर्गा असून येथे दरवर्षी तीन दिवसांचा उरूस भरतो. झालारापाटण येथील सूर्यमंदिर अतिशय प्रसिद्ध असून शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराची वास्तुकला अतिशय अप्रतिम आहे. १० व्या शतकात मालवा परमार वंशियांनी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. मंदिरात विष्णूमूर्ती असून या मंदिराला पद्मनाभ मंदिर असेही म्हटले जाते.

Leave a Comment