‘ऑलिव्ह रिडले’चे रहस्य उलगडण्यासाठी डब्ल्यूआयआयने घेतला पुढाकार


मुंबई – भारतीय वन्यजीव संस्थेने (डब्ल्यूआयआय) थंडीच्या हंगामात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर दाखल होणाऱ्या ऑलिव्ह रिडले या कासवाच्या प्रजातींचे रहस्य उलगडण्यासाठी पुढाकार घेतला असून हे कासव कुठून येतात आणि कुठे जातात याबाबतचे संशोधन सुरू आहे.

डब्ल्यूआयआय या केंद्रीय वन विभागाच्या संस्थेतील विद्यार्थी पश्‍चिम किनारपट्टीवर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले या कासवांच्या प्रजातीवर पीएच.डी. करणार आहेत. लवकरच सुरुवात या संशोधनाला होणार असल्याची माहिती डब्ल्यूआयआयच्या सुमेधा कोरगावकर यांनी दिली.

ऑलिव्ह रिडले एरव्ही दक्षिण कोकणात दिसतात; पण मुंबई किनाऱ्यावरही काही वर्षांपासून त्यांचे दर्शन होते. या प्रजातीच्या कासवांचे मृतदेह जहाजांच्या धडकेमुळे कुजलेल्या अवस्थेत मुंबई किनाऱ्यावरही सापडले आहेत. हे कासव पश्‍चिम किनारपट्टीवर थंडीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी येतात. त्यांची संख्या सुमारे १०० असते, परंतु ते नेमके कुठून येतात आणि मार्चमध्ये उन्हाचे चटके बसू लागले की ते कुठे जातात हे अद्यापही रहस्यच आहे. सुमेधा कोरगावकर याबाबत संशोधन करणार आहेत. या विषयावर पुढील तीन वर्षे संशोधन होणार आहे. त्यासाठी आवश्‍यक निधीसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

पश्‍चिम किनारपट्टीवर येणाऱ्या कासवांच्या तुलनेत पूर्व किनारपट्टीवर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांची संख्या ही अधिक आहे. त्यांच्या स्वभावातही फरक आहे. पूर्व किनारपट्टीचा भूभाग मोठा आहे, त्या मुळे अंडी घालण्यासाठी ऑलिव्ह रिडले कासवांना पुरेशी जागा मिळते. पश्‍चिम किनारपट्टीच्या तुलनेत पूर्वेकडील समुद्रावरील मानवी अतिक्रमणही कमी आहे.

Leave a Comment