मॅरॅथॉनसाठी तयारी करताना…


उन्हाळा कमी होऊन हवेमध्ये गारवा जाणवू लागला की चाहूल लागते थंडीच्या मोसमाची. याच वेळी आणखी एक मोसमही सुरु होतो. तो मोसम म्हणजे मॅरॅथॉन्स चा मोसम. या काळामध्ये देशभरातील अनेक शहरांमध्ये मॅरॅथॉन स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमध्ये भाग घेणारे धावपटू देखील मॅरॅथॉनच्या काही महिने आधीपासून तयारीला लागतात. ही तयारी कशी करायची याबद्दल रीबॉक रनिंग स्क्वाडच्या अनुभवी धावपटूंनी केलेल्या सूचनांचा अवलंब आपण करू शकता.

मॅरॅथॉनसाठी तयारी करीत असताना आपल्याला किती अंतर धावायचे आहे ह्याचे लक्ष्य मनाशी पक्के करणे आवश्यक आहे. असे केल्याने तितके अंतर धावायचे आहे, आणि त्यासाठी आवश्यक ती मेहनत करायची आहे, अशी मनाची तयारी होते. एकदा का मनाची तयारी झाली, की त्यादृष्टीने शारीरिक तयारी करणे ही शक्य होते. धावण्याचा सराव करीत असताना शरीरातील मुख्य स्नायू आणि core areas मधील स्नायूंना पुरेसा व्यायाम मिळेल अश्या प्रकारे आपले व्यायामाचे वेळापत्रक आखावे. strength training ( वजनांच्या सहायाने स्नायूंना बळकटी आणण्यासाठी केले जाणारे व्यायाम ) साठी आठवड्यातून किमान दोन दिवस तरी वेळ देणे आवश्यक आहे. या मुळे आपला स्टॅमिना वाढेल आणि शरीर आपण निश्चित केलेले अंतर धावून जाण्यासाठी हरतऱ्हेने तयार होण्यास मदत मिळेल.

मॅरॅथॉनची तयारी करत असतानाच्या काळामध्ये तज्ञ लोकांकडून अधून मधून मार्गदर्शन घेत राहणे उत्तम. असे केल्याने आपली तयारी योग्य दिशेने सुरु आहे किंवा नाही, किंवा आपण करत असलेल्या तयारीमध्ये काही व्यायाम कमी – जास्त करायचे असल्यास, किंवा त्यामध्ये काही बदल करायचे असल्यास, तसे मार्गदर्शन आपल्याला योग्य वेळी मिळू शकेल. तसेच आपण पहिल्यांदाच मॅरॅथॉनची तयारी करीत असल्यास, तुमचे लक्ष्य नेमके किती धावण्याचे हवे, या बद्दलही तज्ञ आणि अनुभवी धावपटू तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.

तयारी दरम्यान आपल्या आहाराकडे लक्ष देणे ही गरजेचे आहे. आपल्या आहारामध्ये भरपूर प्रथिने, जीवनसत्वे, कॅल्शियम, आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असलेले अन्नपदार्थ समाविष्ट करा. सोडा किंवा जास्त प्रमाणात साखर असलेली पेये टाळा. त्याचबरोबर रात्री खूप उशिरा जेवणे, किंवा पचण्यास जड अन्नपदार्थ रात्रीच्या वेळी खाणे आवर्जून टाळा. आपल्या दिवसाची सुरुवात पौष्टिक न्याहारीने करा. त्यामुळे दिवसभर तुमच्या शरीरामध्ये उत्साह टिकून राहील.

मॅरॅथॉनची तयारी करताना आपल्या क्षमतेची जाणीव ठेवा. आपल्या क्षमतेनुसारच आपले ध्येय निश्चित करा. आपल्या शारीरिक क्षमतेच्या बाहेर जाऊन आटापिटा करुन श्रम घेतल्यास फायदा होण्यापेक्षा नुकसानच होण्याची शक्यता अधिक असते. तयारी दरम्यान आपल्या आसपास कुठले रनिंग इव्हेंट्स असल्यास त्यातही शक्यतो सहभाग घ्यावा म्हणजे आपल्या शारीरिक तयारीचा अंदाज आपल्याला येतो. धावताना आपण घालत असलेले कपडे कशा प्रकारचे आहेत हे पहाणे ही खूप महत्वाचे असते. कपडे अति ढगळ किंवा अति घट्ट असू नयेत. तसेच घाम शोषला जाईल अश्या कपड्याचे बनलेले असावेत. आजकाल ‘ड्राय फिट’ प्रकारचे कपडे बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्याचा वपर करावा. कपड्यांबरोबरच धावण्यासाठी वापरायचे शूज चांगल्या प्रतीचे असणे अतिशय महत्वाचे आहे. धावायला सुरुवात करण्याआधी आणि धावणे संपल्यानंतर करावयाचे व्यायाम ही करणे आवश्यक आहे.

मॅरॅथॉनसाठी ट्रेन करताना मॅरॅथॉन पूर्वी अठरा ते वीस आठवडे तयारीस सुरुवात करणे चांगले. आठवड्यातून तीन ते पाच दिवस धावणे, आणि मधले दोन दिवस क्रॉस ट्रेनिंग, किंवा योगासने असे तयारीचे वेळापत्रक ठेवावे. आठवड्यातून एखादा दिवस विश्रांती घेणे ही गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment