सैराटच्या हिंदी रिमेकचे नाव ‘हे’ असेल!


मराठी चित्रपटसृष्टीचे सगळे विक्रम नागराज मंजुळेंच्या सैराटने मोडीत काढले. बॉलीवूडचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने मराठीतील सैराटचे यश बघून हिंदीमध्ये सैराट बनवण्याचा निर्णय घेतला. हिंदी सैराटमध्ये आर्चीच्या भूमिकेमध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर तर परशाच्या भूमिकेत शाहिद कपूरचा भाऊ इशान खत्तर दिसणार आहे.

बॉलीवूड हंगामा या वेबसाईटने सैराटच्या या हिंदी रिमेकचे नावही ठरल्याची बातमी दिली आहे. ‘धडक’ असेल सैराटच्या या हिंदी रिमेकचं नाव असे वृत्त बॉलीवूड हंगामाने दिले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खैतान करणार आहे. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला दिलेले संगीत प्रचंड लोकप्रिय झाले होते. पण नक्की कोणाचे संगीत हिंदी सैराटमध्ये असणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. सैराटमध्ये महाराष्ट्रातील ऑनर किलिंगचं धक्कादायक वास्तव दाखवण्यात आले होते. राजस्थानमध्ये सैराटच्या हिंदी रिमेकचे शूटिंग होणार असल्याचे बोलले जात आहे. डिसेंबर २०१७ मध्ये या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जून किंवा जुलै महिन्यात रसिकांच्या भेटीला येणार आहे.