ऑटोमॅटिक कलाश्निकोव्ह ४७ ( एके ४७ ) कोणी आणि कशी बनविली?


ए के ४७ या सर्वात खतरनाक बंदुकीचे निर्माणकर्ता मिखाईल कलाश्निकोव्ह यांचा जन्म १० नोव्हेंबर १९१९ साली झाला. कलाश्निकोव्ह रशियन सेनेचे जनरल होते, आणि त्यासोबत शास्त्रज्ञ आणि नेव्ही इंजिनियर देखील होते. त्यांनी ए के ४७ या रायफलचे निर्माण कसे केले, याची कथा मोठी रोचक आहे. कलाश्निकोव्ह सतत काही ना काही कारणाने आजारी असत. एके दिवशी डॉक्टरना भेटण्यासाठी म्हणून कलाश्निकोव्ह रुग्णालयात गेले होते. त्यावेळी तिथे डॉक्टरांची वाट पहात थांबलेले काही रशियन सैनिक रशियन बनावटीच्या हत्यारांना नावे ठेवीत होते. त्यांचे हे बोलणे ऐकून कलाश्निकोव्ह यांनी नवीन रायफल करण्याचा निश्चय केला, आणि ए के ४७ रायफलचे निर्माण झाले. कलाश्निकोव्ह यांनी ए के ४७ शिवाय ए के ७४, ए के १०१, ए के १०३, ए के १०५, ए के १२, इत्यादी शस्त्रांचे निर्माण केले आहे. पण ए के ४७ ही रायफल त्यांनी बनविलेल्या आणि आजच्या काळामध्ये जगामध्ये अस्तित्वात असलेल्या हत्यारांपैकी सर्वात खतरनाक आणि सर्वात जास्त मागणी असलेली रायफल आहे. या रायफलबद्दल जाणून घेऊ या.

या रायफलचे पूर्ण नाव ऑटोमॅटिक कलाश्निकोव्ह ४७ असे असून, ही स्वयंचलित रायफल आहे. मिखाईल कलाश्निकोव्ह यांनी ह्या रायफलचे निर्माण केल्यामुळे त्यांचे नाव या रायफलला देण्यात आले आहे. ह्या रायफलचे निर्माण १९४७ साली केल्याने याच्या नावामध्ये ‘४७’ आकड्याचा समावेश आहे. पूर्वीच्या काळी अस्तित्त्वात असलेल्या रायफल कडाक्याच्या थंडीमध्ये हातामध्ये ग्लोव्हज घालून चालविता येत नसत. ही अडचण लक्षात घेऊन कलाश्निकोव यांनी ग्लोव्हज घालूनही ही बंदूक चालविता येईल अश्या प्रकारे याचे डिझायनिंग केले. या आणि अशाच अनेक सोयी लक्षात घेऊन तयार केलेली ही रायफल लवकरच जगभरामध्ये प्रसिद्ध झाली आणि वापरली जाऊ लागली.

हे रायफल ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक या दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक रायफलमधून एकदाच ट्रिगर दाबल्याने सर्व गोळ्या रायफलमधून दहा सेकंदात ‘ फायर ‘ केल्या जातात, तर सेमी ऑटोमॅटिक रायफलमधून एकदा ट्रिगर दाबल्याने एकाच गोळी फायर केली जाते. अजब गोष्ट अशी की ही रायफल तयार करीत असताना कलाश्निकोव्ह सतत या रायफलची चाचणी करीत असत. या चाचण्या करीत असताना, सुमारे एक लाख वेळा त्यांनी ही रायफल फायर केली होती. ह्या रायफलचा आवाज इतका मोठा होता, की या रायफलच्या चाचण्या घेता घेता कलाश्निकोव्ह यांची श्रवणशक्ती कमकुवत होऊन गेली होती.

ए के ४७ या रायफलचा सर्वाधिक वापर अफगाणिस्तान मधील तालिबान या दहशतवादी संघटनेद्वारे केला जातो. आपल्या आविष्काराचा आपल्याला अभिमान आहे, पण ह्याचा वापर आतंकवादी करीत असल्याचे दु:ख असल्याचे कलाश्निकोव्ह म्हणत असत. सर्वसामान्य नागरिकांनी ही रायफल वापरणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे सामान्यतः ही रायफल कोणाच्या संग्रही क्वचितच आढळते. आजच्या काळामध्ये जगभरामध्ये दहा कोटी ए के ४७ अस्तित्वात आहेत. या रायफलची विशेषता अशी, की अगदी एखादी नवशिकी व्यक्ती देखील ही रायफल सहज हाताळू शकते. ह्या रायफलची शूटिंग रेंज ३००-४०० मीटर असून, ही तीन फूट लांबीची रायफल केवळ चार किलो वजनाची आहे.

Leave a Comment