कौसल्यामातेच्या माहेरी प्रभू राम बंदीवासात


दशरथपत्नी व रामाची माता कौसल्यादेवीचे देशातील एकमेव मंदिर छत्तीसगडची राजधानी रायपूर पासून २५ किमीवर असलेल्या चंदखुरी या गावात असून हे गांव कौसल्येचे जन्मगांव असल्याचे मानले जाते. म्हणजेच प्रभूरामचंद्रांचे ते आजोळ. सर्वात नवलाची गोष्ट अशी की येथे रामाचेही एक प्राचीन मंदिर असून ते गेली २५ वर्षे कुलूपबंद आहे. सरपंचांच्या घराला लागून असलेल्या या मंदिराच्या मालकीची जमीन कोणाच्या मालकीची या वादावरून हे मंदिरच बंद केले गेले आहे यामुळे आजोळघरीच बंदीवासात राहण्याची वेळ श्रीरामचंद्रांवर आली आहे.

चंदखुरी या निसर्गसुंदर गावात १२८ तलाव आहेत. पैकी ७ तलावांच्या मध्ये कौसल्यामातेचे मंदिर आहे. कौसल्यामातेच्या कुशीत राम असलेली प्रतिमा सोमवंशीय राजांच्या काळातील म्हणजे आठव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. ही प्रतिमा एका तलावातून मिळाली आहे. वेदात दक्षिण कौसलचा उल्लेख येतो ते हेच कौसल असून सध्या हा छत्तीसगढ राज्याचा भाग आहे. कौसल्येचे वडील भानुमंत हे राजे होते व येथेच दशरथाचा विवाह कौसल्येबरोबर झाला होता असे सांगितले जाते.

१०० वर्षांपूर्वी या गावातील एका व्यापार्‍याने राम मंदिराची उभारणी केली व त्यासाठी १६ एकर जमीन दान दिली. त्यानंतर हा व्यापारी गाव सोडून गेला व त्यानंतर या जमिनीची मालकी कुणाची यावरून वाद सुरू झाले. ते इतके विकोपाला गेले की शेवटी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले. तेव्हापासून मंदिराला कुलूप आहे. वास्तविक येथील रामाची प्रतिमा प्राणप्रतिष्ठा करून स्थापन केली गेली आहे मात्र रामनवमीच्या दिवशीही या मंदिराचे कुलूप उघडले जात नाही तर बाहेरूनच रामाची पूजा केली जाते.

Leave a Comment