‘ हाद्झा डाएट ‘ बद्दल तुम्हाला माहिती आहे का?


टांझानिया देशामधील हाद्झा नामक आदिवासी जमात, ही भटकी जमात असून त्यांची आहारपद्धती जास्तकरून निसर्गातील ऋतूंवर अवलंबून आहे. तसेच त्यांचे वास्तव्य ज्या ठिकाणी असते, त्या परिसरात जे काही उपलब्ध असेल, त्यावरच त्यांची गुजराण होत असते. जंगलामध्ये पिकणारी फळे खाऊन ही जमात आपली गुजराण करीत असते. त्यामुळे त्या लोकांच्या आहारामध्ये फायबर फार मोठ्या प्रमाणात असते. त्या लोकांची आहारपद्धती तशी असल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणवर फायबर पचविण्याचे कार्य करण्यास त्यांची पचनेन्द्रीये सरावलेली असतात. पण भारतीय आहारपद्धतीमध्ये फायबरची मात्र तितकी जास्त नाही. किंबहुना इतक्या मोठ्या प्रमाणात खाल्लेले फायबर आपण पचवूच शकत नाही. त्यामुळे नेहमीच्या अन्नपदार्थांचा त्याग करून ज्यांना हाद्झा डाएट स्वीकारायचे असेल, त्यांना हा बदल कितपत झेपेल, हे प्रत्येक व्यक्तीच्या खानपानाच्या सवयीवर अवलंबून असते, असे आहारतज्ञांचे म्हणणे आहे.

आहारतज्ञांच्या म्हणण्यानुसार अजून भारतीय आहारपद्धती पाश्चात्य आहारपद्धती प्रमाणे संपूर्णपणे ‘ प्रोसेस्ड ‘ झालेली नाही. भारतीय खाद्यपरंपरेमध्ये आजही ऋतूंच्या नुसार आणि आपण रहात असलेला प्रांत लक्षात घेऊनच आहारपद्धती स्वीकारली जाते. त्यामुळे कोणत्याही आदिवासी जमातीच्या आहारपद्धतीचे अंधानुकरण करणे घातक ठरू शकते. त्यामुळे ज्यांना हाद्झा डाएट स्वीकारायचे असेल, अश्या व्यक्तींकरिता आहार तज्ञांनी भारतीय खाद्यपरंपरा लक्षात घेऊन हाद्झा जमातीतील खानपानाच्या काही नियमांचा अंगीकार करून डाएट आखले आहे. हे डाएट भारतीय लोकांना जास्त फायदेशीर ठरेल असे आहारतज्ञांचे म्हणणे आहे.

या डाएटचा स्वीकार करायचा असल्यास फायबरची मात्र अधिक असलेल्या अन्नपदार्थांना प्राधान्य द्यावयास हवे. ताजी फळे, भाज्या, डाळी, कडधान्ये या सर्वांचा आहारात जास्त समावेश केलेला असावा. तसेच हे डाएट करीत असताना, प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड अन्नपदार्थांचे सेवन पूर्णपणे वर्जित करावयास हवे. जैविक पद्धतीचा ( organic )वापर करून पिकविलेल्या अन्नपदार्थांचे सेवन करावे, तसेच नैसर्गिक ऋतू, हवामान लक्षात घेऊन अन्नपदार्थांचे सेवन करावे.

या आहारपद्धतीचे काही दुष्परिणामही आहारतज्ञांनी नमूद केले आहेत. या आहारपद्धतीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असून, पाण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे हे डाएट सुरु केल्यानंतर काही व्यक्तींना मळमळणे, उलट्या होणे, अपचन, जुलाब होणे, पोट फुगणे, पोटदुखी इत्यादी त्रास उद्भवू शकतात. या डाएट मध्ये साध्या कर्बोदाकांची ( simple carbs ) ची मात्र नगण्य असल्याने हायपोग्लायसिमिया सारखा आजार उद्भवू शकतो. या आहारामध्ये मीठ संपूर्णपणे वर्ज्य आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेली सॉल्ट्स या आहारातून मिळत नाहीत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment