इंजिनियरिंग नंतर…

 इंजिनियरिंग नंतर काय ? असा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. पदवी मिळाली की अनेक वाटा असतात आणि नोकरी खुणावत असते. अनेकांना चटकन नोकरी पकडण्याची घाई असते. पण काही जणांना उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असते. उच्च शिक्षण घेतानाही देशात की परदेशात ? असा प्रश्न असतो. काही जणांनी आपल्या मनात पुढचा मार्ग निश्चित केलेला असतो पण बहुतेकांच्या मनात संभ्रम असतो. तो संपला पाहिजे. साधारणतः पाचवी सेमिस्टर संपली की आपल्या घरातल्या वडीलधार्‍या मंडळींशी आणि आपल्या परिचितातल्या काही जाणकारांशी विचार विनिमय करून तसेच आपली परिस्थिती, कुवत आणि आवड निवड यांचा विचार करून आपला मार्ग नक्की करावा. सहावी सेमिस्टर संपून गेली तरीही आपला निर्णय झाला नसेल तर आपली दिशा चुकण्याची तर शक्यता आहेच पण पदवी प्राप्त झाल्यानंतरचे एखादे वर्ष वाया जाण्याचीही शक्यता असते.   ही वेळ निवडण्याचे कारण असे की नोकरी करायची असेल तर सहाव्या सेमिस्टरच्या वेळीच कँपस इन्टरव्ह्यू सुरू होतात. संभ्रमात असलेले विद्यार्थी काहीच निर्णय झाला नसल्यास या मुलाखतींचीही तयारी नीट करीत नाहीत आणि पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीनेही  म्हणावी तशी पूर्वतयारी करीत नाहीत. म्हणून एका दिशा निश्चित करावी आणि तिच्या तयारीला लागावे. तरच पुढची वाटचाल निर्वेध होते. उच्च शिक्षणाचा आपला निर्धार असेल आणि पुढे एखाद्या विषयात स्पेशलायझेशन करायचे असेल तर काय कराल?   

अभियांत्रिकी पदवीनंतर स्पेशलायझेशनला अनेक शाखा उपलब्ध आहेत. त्यांची माहिती घेतली पाहिजे. ते शिक्षण देणार्‍या संस्था कोणत्या आणि त्यांची प्रवेशपरीक्षा घेण्याची वेळ, प्रवेशाची पद्धती, त्यांच्या कडे उपलब्ध असलेल्या आरक्षणाच्या सोयी काय आहेत याचा तपशीलवार अभ्यास केला पाहिजे. अनेकदा काही संस्थांत राखीव जागा असतात पण त्या ज्यांच्यासाठी असतात त्यांना त्याची माहितीही नसते. आपली पदवी मेकॅनिकलची असेल तर  स्पेशलायझेशन साठी आपल्याला थर्मल, मशीन डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियरिंग, इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग, एअरोस्पेस  इंजिनियरिंग या शाखा उपलब्ध आहेत. आपली बेसिक डिग्री सिव्हिल इंजिनियरिंगमध्ये असेल तर आपल्याला स्ट्रक्चरल इंजिनियरिंग, जिओटेक्निकल इंजिनियरिंग, एन्व्हायरन्मेंटल इंजिनियरिंग, वॉटर रिसोर्सेस इंजिनियरिंग, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट,  सस्टेनेबल इंजिनियरिंग अशा शाखा स्पशलायझेशनशाठी उपलब्ध आहेत. या सार्‍या विषयात केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक शिक्षण संधी आहेत. भारतातल्या उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त करण्यासाठी ग्रॅज्युएट अॅप्टीटयूट टेस्ट इन इंजिनियरिंग (गेट) ही परीक्षा द्यावी लागते तर अमेरिकेत अशी संधी मिळवण्यासाठी जीआरए ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन ही परीक्षा द्यावी लागते. त्याशिवाय टी.ओ.इ.एफ.एल. ही परीक्षा दिल्यानंतर तिच्यात उत्तीर्ण होऊनच तिथल्या विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी अर्ज करता येतो. पण तिथे उच्च शिक्षण घेतल्यानंतर भारतात चांगली नोकरी मिळू शकते.

1 thought on “इंजिनियरिंग नंतर…”

  1. Plz give speciallization in civil engineering
    And advice for career in India as well as other countries.

Leave a Comment