रिझ्युम बोलका हवा

नोकरी मिळवणं हे एक प्रकारचे मार्केटिंग असते. मार्केटिंग म्हणजे आपले स्वतःचे मार्केटिंग. आपण कोण आहोत, कसे आहोत आणि ज्या ठिकाणी अर्ज करीत आहोत तिथे नोकरी देण्याच्या पात्रतेचे आहोत की नाही हे आपल्या रिझ्युम मधून सुरुवातीला स्पष्ट होत असते आणि नंतर आपल्या या पात्रतेचे तपशील प्रत्यक्षात मुलाखतीत स्पष्ट होत असतात. म्हणजे आपला रिझ्युम ही आपल्या मार्केटिंगची सुरूवात असते. अनेकदा काही उमेदवार मुलाखतीत काय विचारले जाईल याचा अंदाज करीत बसतात. किंबहुना काही अवघड प्रश्न विचारले तर काय करावे ? अशी धास्ती त्यांना असते. या धास्तीपोटी ते आपल्या मनाशी काही संभाव्य प्रश्न निर्माण करतात आणि त्यांची उत्तरे पाठ करीत बसतात.

नोकरी मिळवणारांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपली मुलाखत घेतली जाते तेव्हा ती घेणारांच्या समोर आपला अर्ज, आपला बायोडाटा किवा रिझ्युम ठेवलेला असतो. आणि साहजिकच मुलाखतीतल्या प्रश्नांची सुरूवात त्या समोरच्या अर्जापासून आणि रिझ्युमपासून होत असते. म्हणून आपल्या रिझ्युममध्ये आपण काय काय लिहिले आहे याची आपल्याला माहिती हवी. तिच्या अनुरोधाने काय प्रश्न विचारले जातील याचा आपण अंदाज करायला हवा आणि त्या प्रश्नांची उत्तरे पण कशी द्यावीत याची आपण आपल्या मनाशी तयारी केली पाहिजे. काही मुला मुलींना आपण अर्ज करताना दिलेल्या रिझ्युम मध्ये नेमके काय लिहिलेले आहे हेही लक्षात नसते. काही मुले खेळाची आवड नसताना ती आहे असे लिहितात पण मुलाखतीत  खेळावर प्रश्न विचारले गेल्यावर मात्र त्यांची दांडी उडते. मग मुलाखत घेणारा त्याला त्याच्या रिझ्युममध्ये खेळाची आवड असल्याचे लिहिले आहे हे लक्षात आणून देतो. तोपर्यंत तो उमेदवार आपला हा नसलेला छंद रिझ्युममध्ये लिहिला आहे हे विसरून गेलेला असतो.

जी संस्था आपल्याला नोकरी देणार आहे ती तीन गोष्टी  जाणून घेणार असते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कोण आणि कसे आहात ? दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कोणती कौशल्ये आहेत  आणि तिसरी गोष्ट तुम्ही ज्या कामासाठी किवा नोकरीसाठी अर्ज केला आहे ती नोकरी करण्याचा तुमचा निर्धार आहे का ? नोकरी कष्टाची असली तरीही तुमचा तीच नोकरी करण्याचा पक्का निर्णय आहे का याची त्यांना खात्री हवी असते. या गोष्टी आपल्या रिझ्युम मधून आधी व्यक्त झाल्या पाहिजेत. आणि त्या अनुषंगाने येणार्‍या  प्रश्नांचा अंदाज करून आपण त्या प्रश्नांची उत्तरे देण्याची आपल्या मनाशी तयारी केली पाहिजे. मुलाखती विषयी अनेकांच्या अनेक समजुती असतात. भरपूर जनरल नॉलेज हाही एक महत्त्वाचा निकष असतोच पण जनरल नॉलेजच्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले म्हणून उमेदवार लगेच काही अपात्र ठरत नसतो. कारण तुम्हाला सगळ्या जगाचे नॉलेज असले पाहिजे असा काही त्यांचा अट्टाहास नसतो. मात्र आपल्या सबंधात आपण रिझ्युममध्ये जे काही लिहिले असेल त्याच्याशी आपण प्रामाणिक असले पाहिजे. आपण त्यात काय लिहिले आहे ते आपल्या स्मरणात असले पाहिजे. रिझ्युम अवास्तवही असता कामा नये आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचे, कौशल्याचे काही घटक उगाच नम्रतेने लपवलेलेही असता कामा नयेत.  

1 thought on “रिझ्युम बोलका हवा”

Leave a Comment