मेडिकल टुरीझमची संधी

भारतात मेडिकल टुरीझम या व्यवसायाला फार चांगली संधी आहे असे म्हटले जाते. या व्यवसायातून २०१२ साली आपल्या देशाला १० हजार कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. मॅकन्सी या संस्थेने हा अंदाज काढला आहे. भारतात या क्षेत्राचा अद्याप म्हणावा तसा विकास झालेला नसतानाही एवढ्या मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा आहे तर मग प्रत्यक्षात हा धंदा विकसित होईल तेव्हा किती उत्पन्न मिळवायची संधी आहे? मेडिकल टुरीझम क्षेत्रात काम करणार्‍या मेडिकल टूर पाल या संस्थेचे ऑपरेशन्स मॅनेजर डॉ. स्मित ठक्कर यांनी भारताला या व्यवसायातून आय. टी. क्षेत्राइतके पैसे मिळवता येतील असे म्हटले आहे. भारतात पर्यटन स्थळे खूप आहेत. वैद्यकीय उपचार उत्तम दिले जातात. त्यांचे दर अमेरिकेतल्या दरापेक्षा दहापटीने कमी असतात. आणि औषधे तुलनेने स्वस्तात मिळतात. या गोष्टींमुळे मेडिकल टुरीझमला  संधी आहेच पण त्यापेक्षा काही गोष्टी अशा आहेत की ज्या जगातल्या इतर कोणत्याही देशात उपलब्ध नाहीत.  भारतात केवळ शस्त्रक्रियाच नाही तर अवयव रोपणाच्याही शस्त्रक्रिया होतात आणि अलीकडे कॉस्मॅटिक उपचारही केले जायला लागले आहेत. या शिवाय  भारतात योग, आयुर्वेद आणि निसर्गोपचार या उपचार पद्धतीही उपलब्ध आहेत. तशा तर जगात कोठेच नाहीत आणि या उपचार पद्धतीचे जगभरात आकर्षण वाढत चालले आहे. या सार्‍या गोष्टी विचारात घेतल्या तर या व्यवसायामुळे कितीतरी अन्य व्यवसायांना चालना मिळतेय याचा अंदाज येतो. त्यातून प्रचंड प्रमाणावर रोजगार निर्मितीही होते.

डॉक्टर, वैद्य, गाईड, हॉटेल, इन्शुरन्स एजन्टस्, वाहन उद्योग, पर्यटन, समन्वयक आदि खास या क्षेत्रातले प्रशासक असा या रोजगार निर्मितीचा मोठा व्याप आहे. त्यांचा विचार करून काही संस्थांनी केवळ मेडिकल टुरीझमचे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अजून तरी केवळ हाच व्यवसाय डाळ्यासमोर ठेवून फार अभ्यासक्रम तयार करण्यात आलेले नाहीत. पण मुंबईच्या इन्स्टिटयूट ऑफ क्लिनिकल रिसर्च या संस्थेने दोन अभ्यासक्रम तयार केले आहेत. पहिला अभ्यासक्रम कमी कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहे. त्या अभ्यासक्रमात या क्षेत्राशी संबंधित विषयांची तोंड ओळख होईल. दुसरा अभ्यासक्रम एम.बी.ए. इन मेडिकल टुरीझम किंवा ट्रॅव्हल मॅनेजमेंट असा आहे. हा अभ्यासक्रम तसा एम.बी.ए. सारखाच आहे पण शेवटच्या वर्षात स्पेशलायझेशन करण्याची सोय आहे. ज्यात हॉस्पिटल मॅनेजमेंट टुरीझम असे विषय शिकवले जातात. अपोलो हॉस्पिटलच्या मेडव्हर्सिटी विभागातर्फे सहा महिन्यांचा ऑनलाईन कोर्स सुरू होत आहे.  या क्षेत्रात परदेशी भाषा बोलणारांनाही चांगली संधी आहे. कारण आपल्या देशातल्या विविध स्टार हॉस्पिटल्समध्ये  परदेशातले पाहुणे आल्यास त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलले पाहिजे. आशिया खंडातले अनेक देशच नव्हे तर यूरोप आणि अमेरिकाही या क्षेत्रातले आपले ग्राहक आहेत. आफ्रिका खंडातल्या देशातूनही आपल्या देशात रुग्ण मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा आहे.