महिलांना करीयरची संधी

दहावी-बारावीचे निकाल लागले की, मोठमोठ्या बातम्या झळकतात. मुलींचे पासाचे प्रमाण मुलांपेक्षा चांगले असल्याचे त्या बातम्यांत आवर्जून नमूद केलेले असते. मुलांपेक्षा मुली हुशार असतात. गांभीर्याने अभ्यास करतात. मग एवढ्या सगळ्या हुशार मुलींचे शिक्षण संपल्यावर पुढे काय होते? मुली केवळ हुशारच असतात असे नाही तर त्या आता मोठ्या संख्येने किबहुना मुलांच्या बरोबरीच्या संख्येने शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेतलेल्या मुलींची सगळ्या विद्याशाखेतली संख्या मुलांइतकी व्हायला लागली आहे. काही वर्षांपूवीं इंजिनियर मुलगी हे नवल वाटत होते पण आता याही शाखेत खूप मुली शिकायला लागल्या आहेत. एवढे शिक्षण घेऊन त्यातल्या काही अपवाद वगळता सगळ्याच मुली गृहिणी म्हणून जीवन व्यतित करीत आहेत.

एका बाजूला विविध उद्योगात प्रशिक्षित, तंत्रकुशल कर्मचारी मिळत नाहीत म्हणून कंपन्या त्रस्त आहेत. तर दुसर्‍या बाजूला अशा कुशल मुली आपले प्रगत शिक्षण विसरून जाऊन केवळ गृहिणी होणे पसंत करीत आहेत. हा केवळ त्या मुलींचाच दोष आहे असे नाही. तो त्यांना नोकर्‍या देणारांचाही दोष आहे. महिला कर्मचारी म्हणजे डोकेदुखी असा कंपन्यांच्या व्यवस्थापनांचाही समज झालेला असतो. महिला घरापासून फार दूरच्या ठिकाणी नोकरी करायला तयार होत नाहीत. त्यांना रात्रपाळी चालत नाही. लग्न, बाळंतपण आणि घरातले सणवार यात त्यांना सतत रजा द्याव्या लागतात. त्यामुळे कंपन्याची भावना, महिला नको अशीच झाली आहे.

हे सगळे खरे असले तरी बदलत्या स्थितीत काही कंपन्यांना पुन्हा एकदा महिलांचेच महत्त्व पटायला लागले आहे. पहिले कारण म्हणजे महिला असोत की पुरुष असोत एकुणात माणसेच मिळेनाशी झाली आहेत. त्यामुळे महिला म्हणून काही अडचणी असल्या तरीही का होईना महिला कर्मचारी मिळतात ना? मग त्यांना घ्यावे असा विचार सुरू झाला आहे. कंपन्यांना जे पुरुष तंत्रज्ञ मिळतात ते वारंवार नोकर्‍या सोडतात. आहे त्या नोकरीतल्या पॅकेजपेक्षा बरे पॅकेज मिळाले की ते नोकरी बदलायला तयारच असतात. कंपन्यांसमोरची ही एक फार मोठी डोकेदुखी ठरली आहे. महिलांचे तसे नसते. एकदा सोयिस्कर नोकरी मिळाली की, त्या सहसा नोकरी सोडत नाहीत. बाळंतपणाची रजा ही त्यांची अडचण असते हे खरे पण ती काही वारंवार जाणवणारी अडचण नाही. कुटुंब नियोजनाच्या काळात प्रत्येक महिला आयुष्यात एखाद दुसरेच मूल होऊ देते. ते तीन चार महिने कंपनीला सोसवते कारण नाही तरी पुरुषांच्या सतत नोकर्‍या बदलण्याने अनेक जागा मोकळ्या असतातच ना !

सोडेक्सो या आय.टी. कंपनीत ३२ हजार लोक काम करतात. त्यात १६ टक्के महिला आहेत. पुरुष आणि महिलांच्या नोकरीचा तुलानात्मक अभ्यास करून ही कंपनी या निष्कर्षाप्रत आली आहे की, महिलांनाच नोकरी दिलेली परवडते. त्यांनी असा महिलांचे प्रमाण २५ टक्केपर्यंत नेण्याचे ठरवले आहे. मनुष्य बळ विकास क्षेत्रात कार्य करणाच्या संस्थाही आता  आपल्या क्लाएंटस्ना असाच सल्ला देत आहे. महिलांचे प्रमाण वाढवण्याचे सुचवत आहेत.