टॉप टेन बाबत सावध

जून महिना आला आणि शाळा महाविद्यालयांतल्या प्रवेशांचा हंगाम सुरू झाला की काही इंग्रजी साप्ताहिके  विशेष पुरवण्या प्रसिद्ध करून देशातल्या चांगल्या महाविद्यालयांची टॉप टेनची यादी जाहीर करायला लागतात. अशा निरनिराळ्या साप्ताहिकांच्या टॉप टेनच्या याद्या समोर ठेवल्या, तर त्या त्या साप्ताहिकाने आपल्या मर्जीप्रमाणे टॉप टेन महाविद्यालये निवडली दिसतात. प्रत्येकाचे टॉप टेन निराळे असतात. मग खरी टॉप टेन कॉलेजेस कोणती हा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे या टॉप टेनवर कितपत विश्‍वास ठेवावा अशी शंका येते. कोणतेही प्रकाशन सर्वात चांगली महाविद्यालये निवडताना काय निकष लावत असते याचा खुलासाही त्या त्या लेखांत दिलेला असतो; पण तरीही या निकषांवर त्या संस्थेची किती सखोल पाहणी केलेली आहे याचा काही उलगडा होत नाही. खरे तर ही साप्ताहिके काही शैक्षणिक कार्याला वाहिलेली नसतात. केवळ प्रवेशाचा हंगाम सुरू झाला म्हणजे एखादी पुरवणी काढून पैसे मिळवण्यापुरतेच त्यांचे शिक्षण प्रेम मर्यादित असते. त्यामुळे त्यांना शिक्षण संस्थांची फार सखोल आणि सविस्तर माहिती असण्याची शक्यता केवळ कमीच असते असे नाही तर जवळ जवळ नसतेच.

देशातल्या हजारो संस्थांतून केवळ दहांची म्हणजे टॉप टेनची निवड करण्यासाठी त्या हजारो संस्थांची माहिती गोळा करण्याची कोणती यंत्रणा त्यांनी राबवलेली असते याचा काही खुलासा त्यांनी केलेला नसतो. काही मोठ्या शहरातल्या कथित नावाजलेल्या निवडक संस्थांमधून त्यातल्या त्यात पैसेवाल्या संस्था टॉप टेन म्हणून जाहीर केल्या जातात.  त्यासाठी काही काम केलेले नसतेच असे नाही. साप्ताहिकाचा एक प्रतिनिधी काही कॉलेजात जातो आणि तिथल्या प्राचार्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून एक फॉर्म भरून घेतो. हीच असते त्यांची पाहणी. या फॉर्मात प्राचार्य जी माहिती भरून देतील त्या माहितीच्या आधारावर मग टॉप टेनची निवड केली जाते. काही वेळा एखाद्या  संस्थेला जाहीरातीचा हेतू मनात ठेवून टॉप टेनमध्ये झळकवले जाण्याचाही संभव असतो. या यादीवर विश्‍वास ठेवून काही विद्यार्थी त्याच महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी धडपडप राहतात. प्रवेशासाठी झुंबड उडाली की हे महाविद्यालय चांगलेच असणार असे लोकांनाही वाटायला लागते. मग फी वाढते. देणगीची मागणी केली जाते.

एकंदरीत टॉप टेन मागे कमर्शियल हेतूही असतो. त्यामुळे प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी कॉलेज सावधपणे निवडावे. एखादे कॉलेज टॉप टेन मध्ये येते या निकषावर अवलंबून राहू नये. एखादे कॉलेज चांगले आहे की नाही याची आपल्या परीने  काही एक पाहणी केली पाहिजे. तास वेळेवर होतात की नाही, अभ्यासेतर चळवळ कितपत आहे, मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी या संस्थेत काय केले जाते, शिक्षक किती अनुभवी आहेत याची आपण स्वत: तपासणी केली पाहिजे. शहरातले काही विद्यार्थी टॉप टेनच्या नादी लागून घरापासून दूरवरचे कॉलेज निवडतात आणि त्यांचा दिवसाचा बराच वेळ कॉलेजाला जाण्या येण्यात खर्च होऊन अभ्यासाला वेळ मिळत नाही. म्हणून आपल्या घराला जवळ पडणारे कॉलेज हा पहिला निकष असला पाहिजे.  

Leave a Comment