रस्त्यावर का असतात पिवळे, पांढरे पट्टे


आपण दररोजच रस्त्यांवरून जातो येतो. महामार्गांवर, मोठ्या रस्त्यांवर अनेकदा पिवळे व पांढरे पट्टे मारलेले आपण पाहतो पण त्यामागची कारणे बर्‍याच जणांना माहिती नसतात. हे पट्टे प्रवासी, वाहन चालकांना कांही सूचना देत असतात. हे पट्टे कधी सलग, कधी दुहेरी तर कधी तुटक रेषांचे असतात. त्यामागे कांही अर्थ असतो.

आपण जात असलेल्या रस्त्यावर दोन पिवळे पट्टे असतील तर लेनमधूनच गाडी चालवा, ओव्हरटेक करू नका असा त्याचा अर्थ असतो. हे पट्टे खंडीत स्वरूपात म्हणजे तुटक तुटक असतील व पिवळ्या रंगात असतील तर त्याचा अर्थ तुम्ही ओव्हरटेक करू शकता मात्र त्याचवेळी समोरच्या वाहनाची व तुमच्या वाहनाची सुरक्षा लक्षात घेऊन करा असा त्याचा अर्थ होतो.


रस्त्यावर एकच पिवळा पट्टा असेल तर त्याचा अर्थ ओव्हरटेक करायला हरकत नाही असा असतो मात्र त्याचवेळी तुम्ही एका लेनमधून दुसर्‍या लेनमध्ये जाऊ शकणार नाही अशी सूचनाही त्यात असते. भारतात प्रत्येक राज्यात पिवळ्या पट्टांचा अर्थ वेगळा आहे. उदाहरणार्थ तेलंगणात या रेषेचे अर्थ ओव्हरटेक करू नका असा आहे.

रस्त्यावर एकाच वेळी अखंड पिवळी व तुटक पिवळी रेषा आखली गेली असेल तर त्याचा अर्थ तुटक रेषा आहे त्याबाजूने तुम्ही ओव्हरटेक करू शकता. रस्त्यावरचा पांढरा पट्टा लेन बदलू नका असा संकेत देत असतो तर पांढरा पट्टा खंडित स्वरूपात असेल तर लेन बदलू शकता मात्र सावधगिरी बाळगून बदला असा त्याचा अर्थ होतो.

Leave a Comment