एटीएममधून बनावट नोट आल्यास ?


सध्याच्या डिजीटल जमान्यात कुणीही खिशात रोख रक्कम घेऊन फिरत नाही. आजकाल सरार्स एटीएम आणि क्रेडिट कार्ड घेऊन आपण फिरतो. पण अनेकदा अत्यावश्यक वेळी एटीएममधून पैसे काढले असता कधीकधी नकली नोटा किंवा फाटक्या नोटा आपल्याला मिळतात. ग्राहक अशात नेमके काय करावे या संभ्रमात असतो. अशावेळी काय केले पाहिजे हे जराही त्याला कळत नाही. अनेकजण घाबरून जातात. त्यामुळे अशावेळी नेमके काय केले पाहिजे याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

जर एटीएममधून बनावट नोट आली तर लगेच घाबरून न जाता किंवा जराही कन्फ्यूज न होता याची माहिती आधी तुम्ही एटीएम गार्डकडे द्या. तो गार्ड तुम्हाला एक रजिस्टर देईल. तुम्ही एटीएम मशिनमध्ये असलेल्या या रजिस्टरवर तुमचा ट्रॅन्झॅक्शन नंबर आणि नोटेचा नंबर नोंदवा. त्यानंतर लगेच एटीमच्या ब्रॅंचमध्ये जाऊन तिथेही तुम्ही थेट तक्रार देऊ शकता. त्याचबरोबर एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्हीसमोर ती नोट दाखवावी.

अनेकदा अनेकांनी आता असे सांगितले की, जर एटीएममधून अशाप्रकारे बनावट नोट आली. तर याबाबत बॅंकही काही तक्रार नोंदवून घेत नाही किंवा त्या नकली नोटा परत न घेत असल्यामुळे समोरचा माणूस पैसे फुकट गेले म्हणून संतापतो. पण संतपण्याची काही एक गरज नाही. नोट नंबर आणि ट्रॅन्झॅक्शन आयडी लिहून तुम्ही थेट आरबीआयकडे याची तक्रार करु शकता.

मुळात बनावट नोटा परत घेण्यास किंवा त्याबाबत तक्रार घेण्यास कोणतीही बँक नकार देऊ शकत नाही आणि तरीही जर असे काही घडले तर तुम्ही बिनधास्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन तुमची तक्रार नोंदवा. तुम्हाला त्यासाठी तुमच्याकडे असलेली माहिती द्यावी लागेल.

आता जर तुम्हाला आरबीआयनंतरही भीती वाटत असेल तर मग तुम्ही थेट पोलिसात जाऊन याबाबत तक्रार देऊ शकता. एटीएममधून निघालेली प्रिंटेड स्लिप तुम्ही पोलिस तक्रार करताना पुरावा म्हणून जमा करु शकता.