आता स्मार्टफोन उत्पादन करणार फ्लिपकार्ट


नवी दिल्ली – लवकरच भारतीय मोबाईल बाजारपेठेत आपला स्मार्टफोन ई-कॉमर्सच्या क्षेत्रात आघाडीवर असणारी फ्लिपकार्ट कंपनी आणत आहे. कंपनीने आपल्या वेबसाईटवर स्मार्टफोन बाजारात आणत असल्याचे जाहीर केले आहे. बिलियन कॅप्चर + असे या फोनचे नाव ठेवण्यात आल्याचेही कंपनीने सांगितले आहे. ड्युएल कॅमेरा या फोनमध्ये देण्यात आला आहे. याबरोबरच फुल एचडी डिस्प्ले, उत्तम बॅटरी या स्मार्टफोनला देण्यात आली आहे. कंपनी या फोनसाठी आपले सर्व्हिस सेंटरही उघडणार असून याची १२५ शहरांमध्ये एकूण १३० सर्व्हिस सेंटर असतील.

सध्या ई-कॉमर्स कंपन्यांना नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि ऑनलाईन खरेदीत झालेली वाढ हे लक्षात घेऊन आपला स्मार्टफोन फ्लिपकार्टने बाजारात दाखल करण्याचे ठरविले आहे. अशाप्रकारे आपली हार्डवेअर उत्पादने बाजारात आणण्याची ही कंपनीची पहिलीच वेळ नसून याआधीही कंपनीने आपले टॅबलेट बाजारात आणले होते. यामध्ये कंपनीने ५ टॅबलेट लाँच केले होते.

आता फ्लिपकार्ट उत्पादित करत असलेल्या या ३२ जीबीच्या फोनची किंमत १०,९९९ रुपये आणि ६४ जीबीच्या फोनची किंमत १२,९९९ रुपये असेल. फोन बाजारात १५ नोव्हेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल. सध्या काळ्या आणि सोनेरी अशा दोनच रंगात या फोनचे उत्पादन कंपनी करणार आहे.

Leave a Comment