केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना देणार नव्या घरासाठी २५ लाखांचे कर्ज


नवी दिल्ली – केंद्र सरकार आता आपल्या कर्मचाऱ्यांना नवे घर बांधण्यासाठी अथवा खरेदी करण्यासाठी ८.५० टक्के व्याज दराने २५ लाख रुपयांचे कर्ज देणार आहे. ही कमाल मर्यादा यापूर्वी साडेसात लाखांची होती आणि सहा टक्के ते साडेनऊ टक्क्यांपर्यंत याचा व्याज दर होता.

याबाबत नगरविकास मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहनिर्माण अग्रिम योजनेचा (एचबीए) लाभ घेत २० वर्षांसाठी २५ लाख रूपये कर्ज देणाऱ्या इतर कंपन्यांच्या तुलनेत सुमारे ११ लाख रूपयांची बचत केली जाऊ शकते. जर २५ लाख रूपयांचे कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सारख्या बँकांकडून सध्याच्या ८.३५ टक्के चक्रवाढ व्याजाने २० वर्षांसाठी घेतल्यास यावर २१,४५९ रूपयांचा हप्ता बसू शकतो.

२० वर्षाच्या अखेरीपर्यंत दिली जाणारी रक्कम ही ५१.५० लाख रूपयापर्यंत पोहोचते. व्याजाची रक्कम ही यामध्ये २६.५० लाख रूपये ऐवढी होते. जर एचबीएकडून २० वर्षांसाठी हेच कर्ज ८.५० दराने घेतल्यास पहिल्या १५ वर्षांसाठी मासिक हप्ता हा १३,८९० रूपये एवढा बसू शकता. त्यानंतरचा हप्ता हा दरमहा २६,४११ रूपये इतका बसू शकतो. याप्रकारे सुमारे ४०.८४ लाख रूपये अदा केले जातील. यामध्ये १५.८५ लाख रूपये व्याज जाईल.

Leave a Comment