या गावात भुतांची लावली जातात लग्ने


आपल्याकडे बराच काळ एखाद्या मुला मुलीचे लग्न जमत नसेल, व उशीरा असे लग्न झाले असेल तर हडळीला नव्हता नवरा व खवीसाला नव्हती बायको अशी म्हण वापरली जाते. हडळी, खवीस हे भुतांचेच प्रकार आहेत. केरळातील कासारगोड जिल्ह्यात मात्र कांही जमातीत आजही खरोखरच भुतांची लग्ने लावली जातात. बालविवाहाला देशात कायद्याने बंदी असली तरी येथे मुले मुली लहान वयातच गेली असतील तर त्यांची भुते झाली असे समजून या बाल भूतांची लग्ने लावली जातात.

ही प्रथा येथे अनेक जमातींत पाळली जाते. लग्ने अगदी विधिवत म्हणजे पत्रिका जुळविण्यापासून ते लग्नातील सर्व विधींप्रमाणे साजरी होतात. फक्त वधू वरांच्या जागी त्यांचे पुतळे आणले जातात. ज्या कुटुंबात लहान वयात मुले मरण पावली आहेत अशा कुटुंबातून अशी भुतांची लग्ने करण्याची प्रथा पाळली जाते. पुतळ्यांना पारंपारिक विवाह पोशाख घातले जातात, वरमाला घातली जाते व लग्नाची मेजवानीही केळीच्या पानावर दिली जाते. मृत मुलांचा सन्मान करण्याची ही एक पद्धत आहे.

यामागे असेही कारण सांगितले जाते की अनेकदा कुटुंबात लहान वयात मुले मरण पावलेली असतात पण कालांतराने या कुटुंबातील दुसर्‍या मुलांना मोठेपणी विवाह न जमणे, घरात सतत अडचणी येणे अशा संकटांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी ज्योतिषी मृत मुलांचा विवाह करा असा सल्ला देतात. मृत मुलांचे विवाह झाल्याशिवाय त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही असाही समज आहे.

Leave a Comment