नोटबंदी निर्णयानंतर उठल्या होत्या या अफवा


मोदी सरकारने अत्यंत अनपेक्षितपणे गेल्या ८ नोव्हेंबरला ५०० व १ हजार रूपयांच्या नोटा चलनातून मध्यरात्रीपासूनच बाद झाल्याची घोषणा केल्याच्या घटनेला आता वर्ष लोटले आहे. हा वर्धापनदिन सत्ताधारी व विरोधी पक्षांनी विविध प्रकारे देशभरात साजरा केला असतानाच नोटबंदीच्या घोषणेनंतर देशात आलेले अफवांचे पीक पुन्हा चर्चेत आले आहे.

नोटबंदी जाहीर झाल्यानंतर देशभरातील रस्त्यारस्त्यांवर व जगव्यापी सोशल मिडीयांवर अफवांचा जणू पूर आला होता. अर्थात या सार्‍या अफवा ठरल्याचे नंतर उघड झाले मात्र तोपर्यंत देशवासियांची हालत अत्यंत नाजूक बनली होती. चलनात आणली जात असलेली २ हजार रूपयांची नोट प्रथमच चलनात येणार असल्याची उत्सुकता असतानाच या नोटेत चीप बसविली गेल्याची अफवा उठली होती. या चीपमुळे या नोटा जमिनीखाली दडविल्या तरी त्यांचा ठावठिकाणा समजणार असल्याचे सांगितले जात होते. त्याचप्रमाणे या नोटा प्लॅस्टीकपासून बनविल्या गेल्या आहेत व त्या जळत नाहीत ही अफवाही खूपच चर्चेत होती.


नोटबंदी नंतर दोन दिवसांत एटीएम नीट चालत नसल्याच्या तक्रारी येंत असल्याच्या व बँकांच्या शाखांबाहेर हिंसाचार होत असल्याच्या अफवाही उठल्या होत्या. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात मिठाची चणचण निर्माण होऊन भाव ४०० रूपये किलोवर गेल्याची जोरदार अफवा होती व त्यामुळे नागरिकांनी मीठ, साखर व अत्यावश्यक सामानाची साठवण सुरू केली होती अर्थात यामुळे दुकानातून ग्राहकांची एकच गर्दी झाली होती.

दक्षिण भारतात १० रूपयांची नाणी बॅन केल्याची अफवा वेगाने पसरली होती व ओरिसातील नागरिकांनी १० रूपयांची नाणी बदलून नोटा द्याव्यात यासाठी बँकांपुढे रांगा लावल्या होत्या. अर्थात पैशांशी संबंधित सर्व अफवांचे रिझर्व्ह बँकेकडून खंडन केले गेले व हळूहळू परस्थिती पूर्वपदावर आली. आता अजूनही २ हजारांची नोट चलनातून लवकरच काढून घेतली जाणार असल्याची अफवा चर्चेत आहे.

Leave a Comment