बजाज डोमिनार ४०० ने पूर्ण केली ट्रान्स सायबेरिन ओडिसी


भारताच्या दुचाकी वाहनांतील अग्रणी बजाज ऑटोच्या डोमिनर ४०० बाईकने जगातील सर्वाधिक कठीण असा ट्रान्स सायबेरियन प्रवास पूर्ण करून त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचण्याची कामगिरी केली. हा प्रवास पूर्ण करणारी ही पहिली भारतीय बाईक ठरली. ५३ दिवसांत या बाईकने उझबेकिस्तान, ताजिकीस्तान, किर्गिजस्तान, कझाकीस्तान, रशिया व मंगोलिया या सहा देशातून प्रवास करून १५६०० किमीचे अंतर कापले.

या प्रवासात बाईकस्वारांना दररोज ३९० किमी हायपर रायडिंग करावे लागले. हा सारा मार्ग खडतर असून जागोजागी उंच पहाड, खोल दर्‍या, गवताळ कुरणे, वाळू, खडकाळ भाग, उभा चढ, तीव्र उतार व अतिशय थंड तापमान यांचा सामना करावा लागतो. बजाजच्या डोमिनर ४०० बाईकने हा सारा प्रवास बिना बॅकअप म्हणजे सर्व्हिस सपोर्टशिवाय पूर्ण केला.

दीपक कामत, दिलीप भट व सुधीर प्रसाद या तिघा रायडर्सनी ही मोहिम फत्ते केली. या तिघांचाही मुंबईत सन्मान करण्यात आला. बजाज टूव्हिलर विभागाचे अध्यक्ष एरिक वास या संदर्भात म्हणाले की इतका खडतर व दीर्घ प्रवास यशस्वी करून आम्ही नवे परिमाण गाठले आहे. या प्रवासात बाईकच्या कोणत्याही मोठ्या सुट्या भागामध्ये बिघाड होणे अथवा तो बदलावा लागणे असा प्रकार घडला नाही. बाईकचे डिझाईन, गुणवत्ता व तंत्रज्ञान उत्कृष्ट असल्याचा हा पुरावा म्हणता येईल.

Leave a Comment