रॉयल एनफील्डने आणल्या ६५० सीसीच्या दोन शानदार बाईक


मिलान : ७ नोव्हेंबरपासून इटलीच्या मिलानमध्ये सुरु झालेल्या EICMA मोटार शोमध्ये रॉयल एनफील्डने अखेर दोन दमदार बाईकवरुन पडदा उठवला. रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर आयएनटी ६५० आणि कॉन्टिनेंटल जीटी ६५० ट्विन या मोटार शोमध्ये सादर करण्यात आल्या.

कंपनीने पॉवर बाईक क्षेत्रात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी ६५० सीसीचे नवे इंजिन आणले आहे. सर्वात आधी युरोपमध्ये या बाईक लॉन्च केली जाणार आहे. तर या बाईक भारतात २०१८च्या जून-जुलै महिन्यात लॉन्च केली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अतिशय शानदार असा दोन्ही बाईकचा लूक आहे. या दोन्ही बाईकमध्ये फक्त पाच टक्केच समानता आहे. रॉयल एनफील्डचे सीईओ सिद्धार्थ लाल यांनी नव्या इंजिनाबाबत सांगितले की, ७५०० आरपीएमपर्यंत हे दमदार इंजिन जात असल्यामुळे प्रतितास १३० ते १४० किमीपर्यंत बाईकचा वेग सहजरित्या पोहोचू शकतो.

सुमारे ३ लाखाच्या घरात नव्या रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर ६५०ची किंमत असू शकते. पण प्रतिस्पर्धी हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट ७५०च्या किंमतीपेक्षा ही किंमत अतिशय कमी आहे. हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट ७५०ची किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे. या दोन्ही बाईकमध्ये फर्स्ट मॉडर्न रॉयल एनफील्ड ६५० ट्विन इंजिन आहे. बाईकमध्ये ८ वॉल्व्ह, एअर/ऑईल कूल्ड, ६४८सीसी पॅरलल ट्विन इंजिन आहे, जे ४७बीएच आणि ५२एनएमचा टॉर्क देते. इंटरसेप्टर ६५० मध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स आहे. या बाईकसाठी जे खास तयार करण्यात आले आहे. कॉन्टिनेंटल ६५०, इंटरसेप्टर ६५० या दोन्ही बाईक अनेक रंग, स्टँडर्ड, रेट्रो कस्टम स्टाईलमध्ये उपलब्ध होतील.

Leave a Comment