मायक्रोसॉफ्टबरोबर ओलाची हातमिळवणी


नवी दिल्ली – तंत्रज्ञान क्षेत्रातील मायक्रोसॉफ्टबरोबर मोबाईल ऍपच्या माध्यमातून ग्राहकांना कॅब सेवा देणा-या ओलाने आंतरराष्ट्रीय पातळीवर भागीदारी केली. आता यानुसार अत्याधुनिक कनेक्टेड व्हेईकल प्लॅटफॉर्म जागतिक पातळीवरील कार उत्पादकांसाठी तयार करण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या मायक्रोसॉफ्ट क्लाऊड, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि प्रोटक्टिव्हिटी वाढविण्यासाठी ओला आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यातील भागीदारीने प्रयत्न करण्यात येईल, यामुळे ग्राहकांना उत्तम सेवेचा लाभ आणि कारची निगराणी ठेवणे शक्य होईल.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार उत्पादकांना आता दोन्ही कंपन्या सादरीकरण करणार आहेत. दोन्ही कंपन्या भविष्यातही भारतात आणि अन्य देशांत मोबिलिटीचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत असे ओलाचे संस्थापक आणि सीईओ भविश अग्रवाल यांनी म्हटले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्स् यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता यामध्ये करण्यात येणार आहे. मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सेवेचा लाभ या भागीदारीने घेता येईल आणि या सेवेचा वापर ओला प्लेमध्येही करण्यात आला आहे. आता कारमध्ये संगणकीय उपकरणांचा वापर वाढत आहे आणि ओलाबरोबर भागीदार करत ग्राहकांना कनेक्टेड, आणि नवीन उत्पादनाचा अनुभव घेता येईल असे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी म्हटले.

Leave a Comment