आहारासाठी अति उपयुक्त काळा तांदूळ


पांढरा तांदूळ म्हणजे साले पूर्ण काढलेला व पॉलिश केल्याने अनेक महत्त्वाची जीवनसत्त्वे नष्ट झालेला तांदूळ असे म्हटले जाते. पोषणमूल्ये अधिक प्रमाणात पुरविणारा ब्राऊन राईस या पांढर्‍या तांदळाची जागा आता घेऊ लागला असतानाच ब्राऊन राईसलाही मागे सारेल असे घटक असलेला काळा तांदूळ भारतात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा तांदूळ खाण्यार्‍यांनाच नाही तर उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनाही खूपच फायद्याचा ठरत असल्याचे सांगितले जात आहे. सध्या मणिपूर, आसाम व पंजाब मध्ये या तांदळाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला तांदूळ ५०० रूपये किलोने तर साध्या पद्धतीने पिकविलेला तांदूळ २५० रूपये किलोने विकला जात आहे.


काळा किंवा अगदी गडद जांभळा असा या तांदळाचा रंग आहे. शिजल्यावरही तो रंग बदलत नाही. या तांदळात अनेक न्यूट्रीअंटस म्हणजे पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. आशियाई देशात हा तांदूळ पूर्वीपासूनच लोकप्रिय आहे.. इंडोनेशिया, फिलिपिन्स मध्ये तो वापरला जातोच पण त्याचे मूळ आहे चीन. येथे या तांदळापासून ब्रेड, पोळ्या, नूडल्स, केक असे विविध प्रकार बनविले जातात. चीनमध्ये प्राचीन काळी हा तांदूळ खास राजपरिवारासाठी वापरला जात असे व त्यामुळे त्याला फॉरबिडन राईस असे नांव दिले गेले होते.


या तांदळावर खूपच कमी प्रक्रिया केली जाते व त्यामुळे त्यातील जीवनसत्त्वे कायम राहतात. यात बी कॉम्प्लेक्स, आयर्न, फॉस्फरस, मँगेनीज असतेच पण त्यात पाण्यात विरघळणारी अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळे कॅन्सरला प्रतिबंध होतो. हा तांदूळ रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतो तसेच त्यातील अँटी इन्फ्लमेंटरी गुणधर्मांमुळे अॅलर्जी, सांधेदुखी, वृद्धत्व दूर होण्यास मदत मिळते. यात फायबर्स किंवा तंतूंचे प्रमाण अधिक आहे व याच्या सेवनातून मिळणारी उष्मांके कमी आहेत यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते व पुरेशी उर्जा मिळतानाच वजन कमी होण्यासही मदत मिळते असा दावा केला जात आहे. या तांदळात ग्लुकोजचे प्रमाण अत्यल्प असल्याने मधुमेहींसाठी तो वरदान ठरतो आहे. व तांदळाचे सेवन रक्तातील वाईट कोलेस्टोरॉल कमी करते असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment