बंद होणार थुकरटवाडीचा हास्यडोस


चला हवा येऊ द्याची टीम गेली तीन वर्षे संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करत आली आहे. अवघ्या काही दिवसांतच मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय झाला. सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० ला थुकरटवाडीतील भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, निलेश साबळे ही अतरंगी मंडळी प्रेक्षकांच्या भेटीस येतात आणि पुढचा एक तास निखळ मनोरंजन करणार याची जणू खात्रीच देतात. पण आता हा तुम्हा सर्वांचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मराठी मनोरंजनसृष्टी ऐवढीच बॉलिवूडलाही ‘चला हवा येऊ द्या’ची भुरळ पडल्याचे आपण पाहिले आहे. चला हवा येऊ द्याचे आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, रितेश देशमुख, इरफान खान, जॉन अब्राहम, रविना, नाना पाटेकर, विद्या बालन हे जबरदस्त फॅन झाले. या कार्यक्रमाची अनेक मान्यवरांनी शान अधिकच वाढवली. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेने स्वतःच कालच्या भागात आता थोडसे थांबण्याची वेळ आल्याचे सांगितले. पण ही विश्रांती काही दिवसांची असणार आहे. हा काही क्षणांचा दुरावा काहीतरी नवे करण्यासाठी असल्याचेही त्याने सांगितले.‘सा रे ग म प’ हा नवीन कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या जागी सुरु होणार असल्यामुळे आजचा थुकरटवाडीतील विनोदांमध्ये लोटपोट होण्याचा शेवटचा दिवस आहे.