पुन्हा एकदा उडू शकतो पेट्रोल-डिझेलचा भडका


नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरात येत्या काळात वाढ होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. एका रिपोर्टनुसार, ८० रुपयांपेक्षा अधिक पेट्रोलचा दर होण्याची शक्यता आहे. तर, डिझेलचा दर ६५ रुपये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सर्वाधिक वाढ झाली आहे. कच्च्या तेलाची किंमत २०१५ सालानंतर पहिल्यांदाच ६२ डॉलर प्रति बॅरल झाली आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्यानंतर आता पेट्रोलच्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच नागरिकांना महागाईचा झटका लागण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाची किंमत जुलै २०१५ मध्ये ६२ डॉलर प्रति बॅरल झाली होती. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली होती. कच्च्या तेलाची किंमत त्यावेळी ५५ डॉलर प्रति बॅरल होती. त्यानंतर जुन महिन्यात घसरण होऊन ४४ डॉलर प्रति बॅरल झाली. पण कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या एका महिन्यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीत जुन २०१७ नंतर ३६ टक्के वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड जुन महिन्यानंतर ३० टक्क्यांनी महाग झाले आहे. तर, डिसेंबर अखेरपर्यंत कच्च्या तेलाची किंमत ६४ डॉलर प्रति बॅरल होण्याची शक्यता असल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर येत्या काळात कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment