आयफोन साठीची ‘दिवानगी‘


भारतामध्ये आयफोन x ची विक्री शुक्रवारपासून ऑफलाईन रिटेल स्टोअर्समध्ये सुरु झाली आहे. आय फोन ची क्रेझ आपणा कोणापासूनही लपलेली नाही. जे लोक आयफोन वापरत असतील, ते इतर कुठल्याही कंपनीच्या फोन चा विचार देखील करू शकत नाहीत. ‘अॅपल‘ कंपनीने दोन महिन्यांपूर्वी आपल्या कंपनीला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन x बाजारात आणला होता. भारतामध्ये आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस ची विक्री या पूर्वीच सुरु झाली असून, आयफोन x हा फोन शुक्रवार पासून विक्रीसाठी बाजारामध्ये उपलब्ध झाला आहे.

आयफोन x हा फोन विकत घेण्याची ‘ दिवानगी ‘ ठाणे शहरात पहावयास मिळाली. महेश पालीवाल नामक एक इसम आयफोन x विकत घेण्यासाठी चक्क घोड्यावर बसून, बँड-बाजा सहित, अगदी वाजत गाजत अॅपल स्टोअर वर पोहोचला. महेश च्या अवती भोवती बँड वाल्यांचा गराडा होता, आणि महेश स्वतः घोड्यावर स्वार होता. सर्वात कमालीची गोष्ट म्हणजे घोड्यावर स्वार असलेल्या महेश च्या हातामध्ये एक मोठा बॅनर असून, त्या बॅनर वर ‘ आय लव्ह आयफोन x ‘ असा मजकूर मोठाल्या अक्षरांमध्ये लिहिलेला होता.

या युवकाचा सगळा ताम – झाम बघून असे वाटत होते, की तो जणू काही आपली नववधू आणण्यासच निघाला आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, महेश ने घोड्यावर बसल्या बसल्याच आपला आयफोन, स्टोर कर्मचाऱ्यांकडून स्वीकारल्याचे समजते. त्यानंतर पुन्हा वाजत गाजतच महेश आपल्या नव्या कोऱ्या आयफोन x सह आपल्या घराकडे रवाना झाला. भारतामध्ये आयफोन x च्या ६४ जीबी फोनची किंमत ८९,००० रुपये असून, २५६ जीबी फोन ची किंमत १,०२,००० रुपये इतकी आहे.

Leave a Comment