काळ्या तांदळाच्या उत्पादनाने शेतकरी मालामाल


पांढर्‍या तांदळापेक्षा अधिक गुणकारी म्हणून ब्राऊन राईस प्रसिद्ध असला तरी आता या ब्राऊन राईसला मागे टाकेल असा काळा तांदूळ सध्या लोकप्रिय ठरला आहे. या तांदळाची शेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठीही हा तांदूळ फारच फायद्याचा ठरत असून सध्या भारतात मणिपूर, आसाम व पंजाबात याची शेती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा तांदूळ ५०० रूपये किलोने विकला जात असून नेहमीच्या तांदळापेक्षा या तांदुळातून शेतकर्‍यांना ५०० पट अधिक किंमत मिळते आहे.


देशातील अनेक राज्यांची सरकारे या तांदळाच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहेत. मूळात हा तांदूळ चीनचा आहे. या तांदळात मोठ्या प्रमाणावर अँटी ऑकिसडंट, अनेक जीवनसत्त्वे व मोंठ्या प्रमाणावर फायबर असून कॅन्सरसह अनेक रोगांवर तो उपयुक्त ठरतो आहे. ईशान्येकडील राज्यातून या तांदळाची शेती २०११ पासून केली जात आहे. प्रथम त्याची सुरवात आसाममध्ये झाली आहे.

या तांदळासाठी किलोला २५० रूपये भाव मिळतो पण हाच तांदूळ सेंद्रीय पद्धतीने पिकविला असेल तर त्याला ५०० रूपये किलोचा भाव मिळतो आहे. या तांदळाला पाणी कमी लागते. याचे बियाणे ईशान्येकडील राज्यातून ऑनलाईन मागविता येते व उत्पादनाची विक्री ई कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून करता येते.