नरेश गोयल यांचा १० रुपयांपासून १२००० करोड पर्यंतचा प्रवास


नवी दिल्ली : जेट एअरवेज ही विमानसेवा पुरवते हे तुम्हाला काही नव्याने सांगायला नको. पण या कंपनीच्या संस्थापकाने केलेला संघर्ष कदाचित कमी लोकांनाच माहिती असेल. या कंपनीचे चेअरमन नरेश गोयल हे आहेत. ज्यांना आज एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. या व्यक्तीकडे एकेकाळी सायकल खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते पण ही व्यक्ती आज एका विमान कंपनीचे मालक आहेत.

पंजाबमधील संगरूर येथून नरेश गोयल यांची कहाणी सुरू होते. २९ जुलै १९४९ मध्ये नरेश गोयल यांचा जन्म संगरूर येथे झाला. एका दागिणे व्यापाऱ्याच्या पोटी जन्म घेतलेल्या नरेश यांच्या बालपणाचा सुरूवातीचा काळ चांगला गेला. पण, त्यांच्यासाठी हा काळ फार दिवस टिकला नाही. त्यांच्या वडिलांचे गोयल यांच्या वयाच्या ११ व्या वर्षी निधन झाले. घरात वडीलांच्या जाण्यानंतर गरीबी आली. घरावर कर्जाचा डोंगर साचला. सर्व वस्तू विकल्या गेल्या. अगदी रहायलाही घर न राहिल्यामुळे आपल्या कुटूंबियांसोबत त्यांनी आपला मुक्काम आजोळी हालवला. त्यांची तिथेही गरीबीने पाठ सोडली नाही.

घरची स्थिती राहण्याचे ठिकाण बदलल्यामुळे बदलली नाही. त्यांच्याकडे घरातून शाळेपर्यंत जाण्यासाठीही पैसे नव्हते. गोयल यांना त्यामुळे शिक्षणासाठी अनेक मैल पायी चालत जावे लागे. सोबतची मुले सायकलवरून शाळेला जात. पण, सायकल घेण्याएवढेही पैसे त्यांच्या आईकडे नव्हते. शाळेला जात असताना आपण चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण घ्यावे आणि पटकन नोकरीला लागावे असे त्यांना वाटत असे. त्यांनी त्यासाठी एका कॉलेजमधून बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतले.

नरेश यांनी १९६७मध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण केल्यानंतर आपल्या मामाच्या ट्रॅव्हल एजन्सीत काम करायला सुरुवात केली. ते त्या कंपनीत लेबनीज एअरलाइन्ससाठी काम करत होते. त्यांना या कामाचे १० रूपये मिळत होते. महिन्याचे एकूण ३०० रूपये व्हायचे. हा प्रवास साधारण ७ वर्षांपर्यंत राहिला. त्यांनी ७ वर्षांनतर स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. पण, त्यांनी पुन्हा मोठ्या कंपन्यांसोबत चांगल्या पदांवर नोकरी करण्यासाठी सुरूवात केली. यात त्यांना इराक एअरवेजसाठी पीआर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसेच, त्यांनी रॉयल जॉर्डियन एअरलाइनसाठी रीजनल मॅनेजर, मिडल ईस्टर्न एअरलाइन्स कंपन्यांसाठी भारतीय कार्यालयातून तिकीट, रिजर्व्हेशन, सेल्स अशा अनेक पदांवर काम केले.

त्यांना या मोठ्या विमान कंपन्यांसोबत काम करताना लोकांच्या आडचणी लक्षात आल्या. त्यांनी मग या अडचणी सोडविण्यासाठी स्वत:च विमानकंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांना कंपनी सुरू केल्यावर सुरूवातीला फार यश आले नाही. त्यांना तोटाच अधिक झाला. पण, कंपनीची प्रगती अल्पावधीतच सुरू झाली. नरेश गोयल आज जेट एअरवेजमुळे भारतातील २० श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जातात.

Leave a Comment