या मंदिरात पुरूषांना आहे बंदी


भारत हा मंदिरांचा देश असे म्हटले तरी गैर ठरू नये. देशात अशी अनेक मंदिरे आहेत जेथे महिला भाविकांना प्रवेश दिला जात नाही. मात्र केरळमधील कोलम जिल्ह्यातील केत्तानकुलांगरा देवी मंदिर हे असे मंदिर आहे की येथे पुरूषांना प्रवेश वर्ज्य आहे. या मंदिरात महिला व तृतीयपंथी जाऊ शकतात पण पुरूषांना जायचे असेल तर महिलांचा पोशाख व महिलांसारखा साजशृंगार करून जावे लागते. वर्षातून एकदा येथे मोठा उत्सव होतो तेव्हा अनेक पुरूष भाविक महिलांचा वेश परिधान करून देवीचे दर्शन घेतात. त्यासाठी मंदिर परिसरात पुरूषांना सोळा शृंगार करून घेण्यासाठी स्वतंत्र मेकअप रूमही आहेत.या वेगळ्या प्रथेमुळे हे मंदिर देशात प्रसिद्ध आहे.


या मंदिरात विशेष उत्सवाच्या दिवशी पुरूष महिलांप्रमाणे साडी नेसतातच पण काजळ, कुंकु, गजरा असे अन्य शृंगारही करतात. देवीची हातात दिवे घेऊन पूजा करतात. पुरूष भाविक नोकरी, आरेाग्य, सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून तसेच कुटुंबाच्या स्वास्थासाठी सुखासाठी ही प्रथा श्रद्धेने पाळतात. देशातील हे एकमेव मंदिर आहे जेथे मंदिराला कळस नाही. देवी म्हणून एका शिळेची पूजा केली जाते. यामागची कथा अशी सांगतात की एकदा एका दगडावर कांही मुले नारळ फोडत असताना या दगडातून रक्त येऊ लागले. त्यामुळे या दगडात कांही दैवी शक्ती असावी म्हणून त्या दगडाची पूजा केली जाऊ लागली व तेथे मंदिर उभारले गेले.

Leave a Comment