ऐकावे ते नवलच! तेलंगणात गाढवाच्या मांसाला मोठी मागणी


औरंगाबादमध्ये काही दिवसांपूर्वी कुत्र्याचे मांस विकण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. असाच प्रकार तेलंगाणात उघडकीस आला आहे. तेथे गाढवाच्या मांसाला मोठी मागणी असून खवय्यांच्या या मांसावर उड्या पडत आहेत. मात्र यात लपवाछपवीचा प्रकार नसून हे मांस राजरोस विकले जात आहे.

गुंटूर आणि विजयवाडा या दोन शहरांमध्ये खासकरून गाढवाचे मांस मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. डुक्कर, ससे, टर्की (पक्षी) आणि अन्य प्राण्यांच्या मांसासोबतच ते विकले जाते. तसेच शिजविलेले आणि तळलेल्या मांसाचे पदार्थ चिकन व मटण या नेहमीच्या पदार्थांसोबत विकण्यात येत आहे. खवय्यांचीही या ठिकाणी गर्दी होत आहे.

मात्र प्राणिहक्क कार्यकर्त्यांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केली असून त्यांनी हैद्राबाद उच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केली आहे. आंध्र प्रदेश व तेलंगाणा या राज्यांतील बेकायदा कत्तलखाने बंद करावेत तसेच दोन्ही राज्यांमध्ये गाढवाच्या मांसाच्या विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गाढवाच्या मांसाच्या विक्रीच्या व्यवसायात काही पालिका अधिकारीही गुंतलेले असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.