असा आहे ‘ हॅलोईन ‘ (halloween)


‘हॅलोईन’ ला ‘ ऑल सेंट्स डे ‘ असे ही म्हटले जाते. हयात नसलेल्या व्यक्तींना आठविण्याचा हा दिवस. यंदाच्या वर्षी अमेरिकन नागरिक या उत्सवामध्ये वापरल्या जाणाऱ्या पेहरावांसाठी तीनशे मिलियन डॉलर्स पेक्षा अधिक रक्कम खर्च करणार असल्याचा अंदाज आहे. हा उत्सव साजरा करताना भीषण, भयावह पेहराव वापरण्याची पद्धत आहे. तसेच मोठे मोठे भोपळे कोरून त्यामध्ये दिवे लाऊन घराबाहेर ठेवण्याची ही पद्धत आहे. या उत्सवादरम्यान सगळेच वातावरण , घराची व आसपासच्या परिसराची सजावट ही काहीशी भयावहच असते. या दिवसाशी निगडीत काही अजब, अविश्वसनीय, विचित्र घटना, व तथ्ये जाणून घेऊ या.

२००९ साली कॅलिफोर्निया मधील मरीना डेल रे या भागामध्ये राहणाऱ्या एका वृद्ध माणसाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. त्याचे शव त्याच्या घराच्या खिडकीतून नजरेला पडत असतानाही कोणी त्याची विशेष दाखल घेतली नाही, कारण हे शव म्हणजे ‘ हॅलोईन ‘ ची सजावट असल्याचा सर्वांचा समज झाला. अशीच घटना २००५ साली देखील घडली होती. डेलावेर येथे राहणाऱ्या एका महिलेने झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केली. तिचे शव तिथे काही काळ तसेच राहिले कारण हे शव ‘ हॅलोईन ‘ निमित्त केलेली सजावट असल्याचा लोकांचा समज झाला.

कोलोराडो येथील मॅनितू स्प्रिंग्स या गावामध्ये ‘ हॅलोईन ‘ च्या निमित्ताने दर वर्षी शवपेटिकांची शर्यत होते. या शर्यतीमध्ये अनेक गट, त्यांनी तयार केलेल्या शवपेटिकेसह भाग घेतात. प्रत्येक गटामधील एका व्यक्तीला त्यांनी बनविलेल्या शवपेटिकेमध्ये ‘ शव ‘ बनून पडून राहावे लागते. बाकीचे लोक शवपेटिका घेऊन जलद धावण्याची शर्यत करतात. या शर्यतीच्या आधी सर्व गट आपापल्या शवपेटीचे प्रदर्शन करतात.

जपान मधील कोबे शहरामध्ये ‘ याकुझा ‘ नावाची गुन्हेगारी संघटना दर वर्षी लहान मुलांसाठी ‘ हॅलोईन ‘ आयोजित करते. ‘ हॅलोईन ‘ साजरा करताना लहान मुलांनी घरोघरी जाऊन कँडी ची मागणी करण्याची पद्धत आहे. त्याच पद्धतीला अनुसरून काही लहान मुले ‘ याकुझा’ ह्या गुन्हेगारी संघटनेच्या मुख्यालयात जाऊन पोहोचली. तेव्हापासून ह्या गुन्हेगारी संघटनेने दरवर्षी लहान मुलांकरिता ‘ हॅलोईन ‘ आयोजित करण्याचे ठरविले.

Leave a Comment