लाक्षागृह भुयाराच्या खोदाईला पुरातत्त्व विभागाची परवानगी


उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात बरनावा येथे असलेल्या भुयाराच्या खोदाईला पुरातत्त्व विभागाने नुकतीच परवानगी दिली असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे काम सुरू होणार आहे व ते तीन महिने चालणार आहे. पुरातत्त्व विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार येथून जवळच असलेल्या सिनौली जवळ उत्खनातात हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले होते तर चंदायन येथील उत्खननात तांब्याचे मुकुट सापडले होते. महाभारतातील नोंदींनुसार कौरवांनी पांडवांना जाळून मारण्यासाठी बांधलेल्या लक्षागृहाचे अवशेष येथे आहेत.

पांडवांना जाळून मारण्यासाठी कौरवांनी लाखेपासून बनविलेला एक महाल त्यांना राहण्यासाठी दिला होता. मात्र महाल लाखेपासून बांधलेला आहे व त्यामागचा उद्देश पांडवांना अगोदरच कळल्याने त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी या महालाखालून एक भुयार खोदले होते. जेव्हा या महालाला आग लावली गेली तेव्हा या भूयारातून जाऊन पांडवांनी त्यांचे प्राण वाचविले होते असे महाभारत सांगते. पुरातत्त्व विभागाचे निवृत्त अधिकारी के.के. शर्मा म्हणाले या भुयाराची महाभारतातील भूमिका महत्वपूर्ण आह. बरनवा म्हणजे त्याकाळचे वर्णाव्रत गांव. पांडवांनी कौरवांकडे जी पाच गांवे मागितली होती त्यात वर्णाव्रताचा समावेश होता. या भुयाराची खोदाई करण्याची मागणी अनेक दिवस केली जात होती.

पुरातत्त्व विभागाने ही मागणी आता मान्य केली आहे. या भुयारात थोड्या अंतरापर्यंत आज जाता येते मात्र पूर्ण मार्ग मोकळा नाही. हे भुयार वळणावळणाचे आहे त्याची खोदाई केली गेली तर ते नक्की कुठे संपते हे पाहून त्याची लांबी मोजता येणार आहे.

Leave a Comment