महिला शेतकरी बनल्या गावाच्या प्रेरणास्त्रोत


मराठवाड्यातील कायम दुष्काळी व त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त होणार्‍या शेतकर्‍यांसाठी एका छोट्याशा गावातील महिलांनी कमी पाण्यात चांगली शेती कशी करता येईल याचा धडा घालून दिला असून या महिला निराश शेतकर्‍यांच्या प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत. कमी पाण्यात धान्योत्पादन घेऊन, बँकेचे कर्ज वेळच्यावेळी फेडून या महिलांनी वर्षाला १ कोटींची उलाढाल यशस्वीपणे करून दाखविली आहे व विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या घरातून, नवर्‍यांकडूनही चांगली साथ मिळते आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील हिंगलाजवाडी येथील महिला गटांनी ही कामगिरी करून दाखविली आहे. येथे देशात अन्यत्र न दिसणारे दृष्य दिसते ते म्हणजे पुरूष मंडळी घर व मुले सांभाळत आहेत तर महिला वर्ग शेतीकामात व्यग्र आहे. ३ हजार लोकसंख्येच्या या गावात शेतीतील हा क्रांतीकारी प्रयोग यशस्वी ठरला आह. शेतकी उत्पादनाचा भाव या महिला शेतकरी स्वतःच निश्चित करतात व स्वतःच बाजारात जाऊन सप्लायरची चर्चा करतात. कोमलवती या महिलांची पुढारी आहे. त्या सांगतात आम्ही आर्थिक तंगीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविला आहे व कमी साधनातही चांगली शेती कशी करायची याचा धडा दिला आहे. आमच्या गावात एकाही शेतकर्‍याने आत्महत्त्या केलेली नाही.

आमच्या जिल्ह्यात पाऊस कमी, शेतीला पाणी नाही त्यामुळे उत्पादन कमी, बँकांच्या कर्जाचा वाढता डोंगर व यामुळे निराश शेतकरी मरणाचा मार्ग जवळ करतोय हे लक्षात आल्यावर आम्ही पुढे सरसावलो. गावाकडे आम्ही जमीनीचा एक छोटा तुकडा शेतीसाठी मागितला. सुरवातीला नकार मिळाला पण नंतर एक तुकडा मिळाल्यावर आम्ही सरकारी योजना जाणून घेतल्या, या जमिनीच्या तुकड्यावर भाज्या लावल्या. त्यातून हळूहळू शिकत आम्ही आता चांगली शेती करतो आहोत व गावच्या मंडळींचाही आमच्यावर पूर्ण विश्वास बसल्याने त्यांनी शेती आमच्या हाती दिली आहे. आमच्या या गावात २०० स्वमदत गट आहेत व त्याच्या २६५ महिला सदस्य आहेत. शेतीबरोबर आम्ही ब्युटी पार्लर, बकरी पालन, दूधव्यवसाय असे जोडउद्येागही करतो आहोत. निती आयेागाकडून आम्हाला पुरस्कार मिळाले आहेत.

या गावात एक नियम घातला गेला आहे. तो म्हणजे कुणालाही काही खरेदी करायची असेल तर ती गावातल्या दुकानातूनच करायची. यामुळे गावातला पैसा गावातच राहतो असेही कोमलवती म्हणाल्या.

Leave a Comment