कौशल्ये साधी पण परिणाम मोठा


कौशल्य विकासाचे आपल्या जीवनावरील परिणाम मोठे सखोल असतात. त्यांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम विचारात घेतला तर असे लक्षात येते की, हा परिणाम जेवढा गाढ आहे त्या मानाने ही कौशल्ये फार सामान्य आहेत. काही नाही अगदी सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने बोला, लोकांना दिलेला वेळ पाळा, वेळ फुकट घालवू नका, स्वच्छ नीटनेटके रहा, सकारात्मक विचार करा अशी ही सामान्य कौशल्ये आहेत. मग हे कौशल्ये एवढी सामान्य आहेत तर ती आत्मसात करून सर्वच लोक मोठे का होत नाहीत ? असा प्रश्‍न आपल्या मनात निर्माण होऊ शकतात पण असे होत नाही.

अनेकांना तर अशी काही कौशल्ये आहेत हेही माहीत नसते. मग त्यांचा विकास करणे तर दूरच. काही लोकांना त्यांची जाणीव असते पण आपण ही कौशल्ये विकसित करून मोठे झाले पाहिजे अशी जिद्द त्यांच्यात नसते. काही लोक मात्र तसा प्रयत्न करतात पण त्यांना यश येत नाही. फार कमी लोकांना कौशल्ये आत्मसात करून यशस्वी होता येते. मग त्यांना यश मिळण्याचे कारण काय असते? त्याचे कारण असते प्रयत्नातले सातत्य. कौशल्य विकासाच्या क्षेत्रातला सातत्य हा घटक फार महत्त्वाचा आहे. केवळ प्रयत्न करण्याने कोणी मोठा होत नाही तर सातत्याने प्रयत्न केल्यानेच तो मोठा होतो. या सातत्यातच लोक कमी पडतात. कौशल्य विकासाचा प्रयास जाणीवपूर्वक करावा लागतो आणि तो दीर्घकाळ करावा लागतो या दोन बाबी सर्वांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

यशस्वी माणसे सर्वांसारखीच असतात. सर्वसामान्य माणसे जे काही करतात तेच ही यशस्वी माणसे करीत असतात. ते काही वेगळे करत नाहीत पण त्यांची ती कामे करण्याची पद्धत वेगळी असते. ते वेगळे काही करीत नाहीत तर वेगळ्या प्रकाराने करीत असतात. हा वेगळा प्रकार म्हणजे जाणीवपूर्वक करणे आणि सातत्याने करणे. ती कौशल्ये त्यांच्या जगण्याचाच भाग बनलेली असतात. तसा त्यांचा स्वभाव झालेला असतो. सर्वांशी गोड बोलावे हे एक चांगले कौशल्य आहे पण यशस्वी लोक गोड बोलणे हा आपल्या जगण्याचाच भाग बनवत असतात. टाइम मॅनेजमेंट हेही एक कौशल्य आहे पण ही मंडळी हे कौशल्य कामापुरते न प्रकट करता तो आपल्या जगण्याच्या शैलीचा भाग बनवून टाकत असतात.
(क्रमश:)

Leave a Comment