काही भारतीय परंपरांमागील शास्त्रीय कारणे


संपूर्ण जगामध्ये आपला भारत देश येथे पाळल्या जाणाऱ्या परंपरा आणि रीतीरीवाजांसाठी ओळखला जातो. ह्या परंपरा आपल्याकडे पिढी दर पिढी चालत आल्या आहेत. पण या चाली रीतींमागे काही शास्त्रीय कारणे आहेत, ज्यामुळे या परंपरांचे आजतागयत पालन केले जात आहे.

स्त्रीयांमध्ये बांगड्या घालायची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. बांगड्या हा केवळ सौंदर्य खुलविणारा अलंकार नाही, तर बांगड्या घालण्यामागे देखील विज्ञान आहे. हातामध्ये बांगड्या घातल्यानंतर हाताच्या हालचाली बरोबर बांगड्या देखील हलत असतात. बांगड्यांच्या हलण्यामुळे झालेल्या घर्षणाने रक्ताभिसरण चांगले राहते. तसेच धातूच्या बांगड्या घातल्याने शरीरातून बाहेर दिली जाणारी उर्जा या धातूमध्ये सामावून पुन्हा शरीरात पाठविली जाते.

पुष्कळ भारतीय प्रांतांमध्ये सुवासिनी स्त्रिया भांगामध्ये सिंदूर लावतात. ही सौभाग्याची निशाणी आहे हे तर खरेच, पण त्याच बरोबर सिंदूर मध्ये अतिशय कमी प्रमाणात पाऱ्याचा वापर केलेला असतो. पाऱ्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होऊन मेंदू सतर्क राहतो. पाऱ्यामुळे रक्तदाब ही नियंत्रित राहतो.

आपल्याकडे नदीमध्ये, विहिरीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये पैसा टाकण्याची पद्धत आहे. हा एक प्रार्थनेचा भाग आहे हा विचार जरी योग्य असला, तरी त्यामागे देखील शास्त्रीय कारण आहे. पूर्वीच्या काळी पिण्याचे पाणी नदीवरून, किंवा विहिरीतूनच भरून आणले जायचे. त्या काळी नाणी तांब्याची असत. ही नाणी पाण्यात टाकून ठेऊन ते पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक असलेले तांबे पाण्यामार्गे पोटात जात असे.

आपल्याकडे दोन्ही हात जोडून नमस्कार किंवा अभिवादन करण्याची पद्धत आहे. नमस्कार मुद्रेमध्ये आपले दोन्ही हात जुळलेले असतात. या दोन्ही हातांवर असलेले डोळे, कान, आणि मेंदूचे प्रेशर पॉइंट्स हात जोडल्याने दाबले जातात आणि डोळे, कान आणि मेंदूच्या कार्याला अधिक चालना मिळते. तसेच पूर्वीच्या काळी लोक सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्नान झाल्यानंतर लगेचच ओलेत्यानेच तुळशीची पूजा करीत असत, किंवा सूर्याला अर्घ्य देत असत. काही ठिकाणी आज ही पद्धत आहे. या पद्धतीचा फायदा असा, की सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ड जीवनसत्वाची मात्रा भरपूर असे. त्यामुळे सूर्याला अर्घ्य देताना किंवा तुळशीची पूजा करताना शरीराला आवश्यक असलेले ड जीवनसत्व आपोआपच मुबलक मात्रेमध्ये मिळत असे.

लग्नानंतर बायकांनी जोडवी घालण्याची पद्धत भारतामध्ये जवळजवळ सर्वच प्रांतांमध्ये आहे. जोडवी पायांच्या दुसऱ्या, म्हणजेच अंगठ्याच्या शेजारच्या बोटांमध्ये घातली जातात. वैज्ञानिकांच्या मते या बोटातील नस स्त्रीच्या गर्भाशयाशी जोडलेली असते. पायांच्या दुसऱ्या बोटामध्ये जोडवे घातल्याने गर्भाशयाला रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होऊन गर्भाशय निरोगी राहते. तसेच जोडवी धातूची बनलेली असल्याने जमिनीतील उर्जा शोषून शरीरामध्ये पाठविण्याचे काम ही जोडाव्याद्वारे केले जाते.

आपल्याकडे अनेक विशेष तिथींच्या वेळी उपवास करण्याची पद्धत आहे. एरवी आपण सर्व प्रकारचे पदार्थ खात असतो. पण उपवासाच्या निमित्ताने केलेल्या लंघानामुळे शरीरातील पचनशक्ती सुधारून शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकली जात असत.

Leave a Comment