मुंबई – वर्षभरापूर्वी राजभवनमध्ये करण्यात आलेल्या उत्खनानदरम्यान १३ खोल्यांचे तळघर आढळून आले होते. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी हे तळघर बांधले असावे असा अंदाज इतिहासतज्ज्ञांनी व्यक्त केला होता. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला या तळघरातील १३ खोल्या आणि राजभवनाचा निसर्गरम्य परिसर पर्यटनासाठी खुला करावा अशी सूचना केली होती. महामंडळाने यानुसार योजना करून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. याचाच पहिला टप्पा म्हणून मंगळवारी महामंडळाने राजभवनात एक पर्यावरणस्नेही बॅटरीवर चालणारे वाहन सुपूर्द केले.
शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, गांधीजी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाच्या स्मृतींना उजाळा देणारी चित्रे, छायाचित्र तसेच शिल्प पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तळघरातील १३ खोल्यांमध्ये साकारली जाणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी राज्याचा इतिहास व परंपरा सांगणारे दृक्श्राव्य कार्यक्रम आणि काही पथनाटय़ेही होणार असल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले आहे.
राजभवन या ऐतिहासिक वास्तूमध्ये निसर्गरम्य परिसर असून मोठय़ा प्रमाणावर जैवविविधता येथे आढळून येते. राज्यपालांच्या सूचनेनंतर हे सर्वसामान्य नागरिकांनी तसेच परदेशी पर्यटकांनी पाहावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. तळघरातील खोल्यांमधील हे काम पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये पूर्ण होईल आणि ही सेवा पर्यटकांसाठी खुली होईल असेही ते म्हणाले. राजभवन पर्यटकांसाठी आठवडय़ातून तीन दिवस खुले राहील व पर्यटक याची नोंदणी ऑनलाइन करू शकतील.