घरगुती गॅस ९४ रूपयांनी झाला महाग


मुंबई : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात केंद्र सरकारने पुन्हा वाढ केली असून, ही गेल्या तीन महिन्यातील तिसरी दरवाढ आहे. मध्यरात्रीपासून या दरवाढीची अंमलबजावणी लागू करण्यात आल्याने सिलेंडरसाठी आता ग्राहकांना ७३९ रूपये मोजावे लागतील. या बरोबरच तब्बल २२० रूपयांची व्यावसायिक वापराच्या सिलेंडरमध्ये वाढ झाल्याने त्याचा परिणाम सर्वच खाद्यपदार्थ विक्रीच्या दरवाढीत होणार आहे.

सरकारच्या नियंत्रणातून तेल कंपन्यांना मुक्त केल्यानंतर गॅसच्या बाबतीतही केंद्र सरकारची पावले त्याच मार्गाने पडू लागली असून, सरकार घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरवर ग्राहकांना अनुदान देत असले तरी, वर्षाकाठी अनुदानीत सिलेंडर वापराची मर्यादा बारा इतकीच ठेवण्यात आल्यामुळे महिन्याकाठी मोठ्या कुटुंबात दोन सिलेंडर वापरणारीही कुटूंबे असल्याने त्यांना आता वाढीव दराने म्हणजेच खुल्या बाजारातील दराने सिलेंडर खरेदी करावे लागणार आहे.

ही वाढ गेल्या तीन महिन्यात सातत्याने झाली असून, सप्टेंबर महिन्यात घरगुती वापराच्या १४ किलो वजनाच्या सिलेंडरची किंमत ५९६ रूपये तर ऑक्टोंबर महिन्यात त्यात वाढ होऊन ६४५ रूपये एवढी झाली. हेच दर नोव्हेंबर महिन्यात आता ७३८ रूपये ५० पैसे इतके झाल्यामुळे घरपोच गॅस सिलेंडर देणा-या कर्मचाºयाला आता ७५० रूपये देण्यावाचून ग्राहकांना पर्यायच राहिलेला नाही.

व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरातही अशाच प्रकारे दर महिन्याला वाढ होत असून, १९ किलो वजनाच्या या गॅस सिलेंडरसाठी सप्टेंबरमध्ये १०८१ रूपये, ऑक्टोंबर महिन्यात ११५८ रूपये व नोव्हेंबर महिन्यात १३०४ रूपये ५० पैसे एवढे झाले आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, चहा टपरी, खाणावळ चालकांकडूनच व्यावसायिक सिलेंडरचा वापर अधिक वापर केला जातो. आता थेट एका सिलेंडरमागे २२० रूपयांची वाढ झाल्यामुळे साहजिकच खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ करण्याशिवाय व्यावसायिकांना पर्याय राहिलेला नाही.

Leave a Comment