बद्रीनाथधामजवळील हे झाड ठरतेय भाविकांचे श्रद्धास्थान


उत्तराखंड राज्यातील चार धामांपैकी एक असलेले महत्त्वाचे बद्रीनाथधाम आता तेथील एका देवदार वृक्षामुळे अधिक प्रसिद्धीस येऊ लागले असून येथे येणारे भाविक या झाडाला आवर्जून भेट देत आहेत. अर्थात यामध्ये बद्रीकेदार मंदिर समितीने घेतलेला पुढकारही महत्त्वाचा ठरतो आहे.

बद्रीधाम हे हिमालयाच्या पर्वतरांगातील तीर्थस्थळ. येथे तशी उंच झाडे अभावानेच आहेत. त्यातून या भागात असलीच तर देवदाराची झाडे जास्त आढळतात. देवदाराच्या झाडाचे खोड सरळ उंच वाढते. मात्र बद्रीनाथ परिसरातील एक झाड याहून वेगळे आहे. याचा संबंध पांडवांशी लावला जात आहे. या झाडाचे खोड जमिनीपासून दोन फूटांपर्यंत सरळ आहे मात्र तेथे त्याला दोन शाखा फुटल्या आहेत. त्यापुढे जाऊन एका शाखेला तीन तर एका शाखेला दोन फांद्या आहेत. पाच फांद्याच्या या झाडाला पंचमुखी देवदार म्हटले जात आहे..

मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार द्वापारयुगात याच रस्त्याने पांडव स्वर्गारोहिणी शिखरावर गेले होते. येथे असलेल्या या आगळ्यावेगळ्या देवदाराची मुख्य शाखा म्हणजे खोड हे पांडू म्हणजे पांडवाच्या वडीलांचे प्रतीक आहे तर दोन शाखा म्हणजे माद्री व कुंती. त्यातील एका शाखेला तीन फांद्या आहेत ते कुंतीचे पुत्र युधिष्ठीर, भीम व अर्जुन स्वरूप आहेत तर दोन फांद्या फुटलेली शाखा म्हणजे नकुल व सहदेव ही माद्री ची दोन मुले आहेत. बद्रीधामचे मुख्य अधिकारी बी.डी. सिंह हे स्वतः वनविभागात अनेक वर्षे काम केलेले आहेत व ते सांगतात माझ्या आयुष्यात असा देवदार मी प्रथमच पाहतो आहे. हा वृक्ष देववृक्षाचे प्रतीक आहे व शास्त्रात देवदाराच्या उल्लेख देववृक्ष असाच केला गेला आहे.

Leave a Comment