आपली खरी किंमत किती ?


मायकेल जॉर्डनच्या गोष्टीचा सर्वात मोठा बोध काय हे आपण पाहणार आहोत. मायकेल वडिलांनी दिलेला एक डॉलरचा कपडा ३०० डॉलरना विकून आला आणि त्याने ते ३०० डॉलर वडिलांच्या हातात ठेवले तेव्हा वडलांना त्याचा अभिमान तर वाटलाच पण त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी मायकेलला जवळ घेतले आणि त्याला विचारले, मायकेल या सार्‍या प्रसंंगातून तू काय शिकलास ? त्यावर मायकेल उत्तरला, बाबा मी हे शिकलो की आपण जिद्दीला पेटलो, युक्तीने वागलो आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली की आपल्याला अशक्य काही नाही. त्यावर त्याच्या बाबांनी त्याच्या लक्षात न आलेला एक धडा त्याला सांगितला.

बेटा हे लक्षात घे की या कापडाची किंमत एक डॉलर आहे असे आपण मानत होतो. तिच्याकडे एक डॉलरची एक वस्तू म्हणून पहात होतो पण प्रत्यक्षात ती तर ३०० डॉलरची होती. आपण आपल्याकडे याच दृष्टीने पाहिले पाहिजे. आपण आपल्याला फार कमी समजत असतो. पण आपली खरी किंमत फार असते. मात्र एक लक्षात ठेव की आपली जी मोठी आणि खरी किंमत आहे ती सिद्ध करावी लागते. ती सिद्ध करण्यासाठी काही प्रयास करावे लागतात. कपड्याची ३०० डॉलर ही खरी किंमत दाखवून देण्यासाठी तू काही तरी प्रयास केलास तेव्हाच ती ३०० डॉलरची किंमत तुला मिळाली आहे. तेव्हा काही तरी प्रयास करावा आणि आपली खरी लायकी जगाला दाखवून द्यावी मग जग आपल्याकडे आदराने पहाते.

शास्त्रही असेच सांगते. आपल्या आत अनेक क्षमता दडलेल्या असतात. सामान्य माणूस हे आपले सर्वांना समोर दिसणारे स्वरूप आहे पण आपल्यात प्रतिसृष्टी निर्माण करणारा विश्‍वामित्र दडलेला असतो. तो दडलेला विश्‍वामित्र प्रकट करण्यासाठी तशी तपश्‍चर्या करावी लागते. ही तपश्‍चर्या म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकास. आपल्याला निसर्गाने जी अफाट क्षमता दिली आहे तिच्याकडे दुर्लक्ष करून आपण त्या क्षमतेच्या एका छोट्या भागात काम करीत रहातो. आपण आपल्याला निसर्गाने दिलेल्या क्षमतेच्या एक टक्का एवढ्याच भागात काम करीत असतो. बहुतेकांना आपल्यात किती क्षमता असते याचाही बोध मरेपर्यंत होत नाही. आपण संगणकाचा वापर करतो खरे पण संगणकाची काम करण्याची खरी क्षमता किती आहे हे आपल्याला माहीतही नसते. त्या संगणकाच्या ज्या छोट्या भागात आपण काम करतो तेवढाच भाग आपल्याला माहीत असतो आणि संगणकाचे काम एवढेच आहे असे आपण मानतही असतो. तसेच आहे आपल्या क्षमतांचे ( क्रमश:)

Leave a Comment