शेतमजूर झाला इंजिनीयर


आजकाल अनेक मुले आणि मुली इंजिनीयर होत आहेत. कोणीतरी अभियंता होणे ही काही नवलाची गोष्ट नाही पण बिहारच्या पुर्णिया जिल्ह्यातल्या हादिॅया या गावातल्या शेतमजुरी करणार्‍या दिलीप सहानी या २३ वर्षांच्या तरुणाने अभियंता होणे हे नवलच आहे कारण त्याने आणि त्याच्या कुटुंबाने दिलीपचे हे स्वप्न पुरे व्हावे म्हणून मोठा संघर्ष केला आहेच पण तो ज्या गावात रहातो त्या गावात अजून कोणीही दहावीपर्यंतही शिकलेला नाही. अशा गावात स्वत: शेतात काम करणार्‍या मुलाने अभियंता होऊन ८ लाखाचे पॅकेज देणारी नोकरी मिळवावी हे मोठेच यश आहे. त्याला ही नोकरी देणारी कंपनी सिंगापूरमध्ये आहे. लोकांच्या रानात उन्हातान्हात काम करणारा हा मुलगा आता या कंपनीत साहेब झाला आहे.

या गावात दैन्य फार आहे. कोणी मुलगा शिकायला लागला तर गावातले लोक त्याच्याकडे कुचेष्टेने पाहतात आणि मोठ्या नवलाने, मजुरी करून पोटापुरते मिळत असताना शिकायची गरजच काय? असा प्रश्‍न विचारतात. खरे तर या लोकांना पोटापुरते मिळत नाही पण त्यातच समाधानी राहण्याची त्यांना वर्षानुवर्षे सवय झाली आहे. सहानी कुटुंब मुळातले दरभंगा जिल्ह्यातले पण त्या जिल्ह्यात काम मिळत नाही म्हणून ते पूर्ण कुुटुंब आपल्या गावापासून २४० किलोमीटर अंतरावरील या गावाला दर जुलैमध्ये स्थलांतरित होते. महाराष्ट्रातल्या ऊस तोड कामगारांसारखे हे स्थलांतर आहे. जुलै ते जानेवारी स्थलांतर आणि जानेवारी ते जुलै पुन्हा आपल्या गावाकडे. अनेक वर्षांपासून हा प्रघात पडला होता व या कुटुंबातल्या पाच सहा जणांना दरमहा दोन ते तीन हजार रुपये मिळत होते.

अशा स्थलांतरित अवस्थेेतच दिलीप याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिल्या आणि तो उत्तम गुणांनी पास झाला. त्याला भोपाळच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. अभियंता होण्याचे स्वप्न पुरे होण्याचा मार्ग मोकळा झाला पण खर्चाचे काय ? त्याचा खर्च भागवता यावा यासाठी या कुटुंबाने आपली जीवन रहाटी बदलली. दिलीपचा धाकटा भाऊ चेन्नईला गेला आणि तिथे त्याने फरशा तयार करणार्‍या कुटुंबात नोकरी धरली. वडील नेपाळमध्ये गेले आणि त्यांनी तिथे आइसक्रिम विकण्याचा व्यवसाय केला. अशा रितीने दिलीपच्या खर्चाची सोय झाली पण त्यासाठी पूर्ण कुटुंबाजची फाटाफूट झाली. ज्यांना पुर्णिया आणि दरभंगा या दोन गावाखेेरीज बाकी काही माहीत नव्हते त्यांनी नवीन गावे गाठली आणि घरात एकाला अभियंता केलेच. आता दिलीपला संगम उद्योगाने नोकरी दिली आहे. कुटुंबाने केलेल्या कष्टाचे चीज झाले आहे.