प्रदूषणामुळे उद्भविणाऱ्या श्वसनाशी संबंधित विकारांवर असे नियंत्रण ठेवा


हवेतील प्रदुषणामुळे दमा आणि श्वसनाशी संबंधित इतर रोगांनी ग्रासलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे श्वसनरोग लहान मुलांमधेही वाढत्या प्रमाणावर पहावयास मिळत आहेत. भारतामधील जवळ जवळ प्रत्येक शहरातील हवेमध्ये कार्बन मोनोक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, पेट्रोल आणि डीझेलमुळे वाहनांतून बाहेर दिला जाणारा धूर व त्यातील घातक वायू, इत्यादींचे प्रमाण धोक्याची पातळी गाठत आहे. वातावरणामध्ये अस्तित्वात असलेल्या या प्रदूषण वाढविणाऱ्या घटकांमुळे श्वासासंबंधी विकार उत्पन्न होऊ नयेत आणि झालेच तर ते लवकर आटोक्यात यावेत, यासाठी काही उपायांचा अवलंब करता येईल.

आपल्या आहारामध्ये गुळाचा आवर्जून समावेश करा. गुळामुळे फुफ्फुसांतील धुळीच्या सूक्ष्म कणांचा नाश होऊन श्वसानासंबंधी तक्रारी कमी होतात. कोळशाच्या खाणींमध्ये काम करणारे खाण कामगार याच कारणासाठी गुळाचे नियमित सेवन करीत असतात. तसेच सकाळी उठल्यावर अर्धा चमचा हळद थोड्याश्या पाण्यामध्ये उकळून घ्यावी. ह्या पाण्यामध्ये मध घालून हे पाणी प्यायल्याने ही श्वासासंबंधी विकारांमध्ये आराम मिळतो.

आपल्या घराच्या आतमध्ये दूषित हवा शोषून घेऊन स्वच्छ वायू देणारी झाडे लावा. अरेका पाम हे झाड यासाठी अतिशय उपयोगी आहे. हे झाड मोठ्या कुंडीमध्ये घराच्या आतमध्ये लावता येते. याला अधून मधून सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. एरवी हे सावलीत देखील चांगले वाढते. तसेच रबर प्लांट ला थेट सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. पीस लिली या जातीच्या झाडालाही सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसल्याने हे ही झाड कुंडीमध्ये लाऊन घरात ठेवता येते. तसेच घरामध्ये कापराचा धूर पसरविल्यानेही घरातील हवेची शुद्धी होण्यास मदत मिळते.

जर हवेतील प्रदूषणामुळे सतत सर्दी होणे किंवा सायनस सारखे विकार उद्भवत असतील, तर गायीच्या दुधापासून तयार केलेल्या तूपाचे थेंब नाकामध्ये सोडावेत. त्याचप्रमाणे एक चिमूटभर पिंपळीची पूड आणि एक चिमूट हळद एकत्र करावी, त्यामध्ये थोडेसे किसलेले आले घालून हे मिश्रण पाण्यामध्ये, पाणी निम्मे होईपर्यंत उकळवून घ्यावे. गार झाल्यावर हे मिश्रण एका बाटलीत भरून ठेवावे. रोज सकाळी एक चमचा मधातून हे मिश्रण घेतल्याने श्वास लागणे, किंवा खोकल्यासारख्या विकारांमध्ये आराम मिळतो.