भारतात येथेही पाहू शकता ताजमहाल


जगातील सात आश्चर्यात गणला गेलेला आग्रा येथील ताजमहाल आज देशात निराळ्या अर्थाने चर्चेत आहे. मुगल सम्राट शहाजहान याने आपल्या मुमताजबेगम या प्रिय पत्नीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून तो बांधला व अशी वास्तू पुन्हा बांधली जाऊ नये म्हणून येथे काम करणार्‍या कारागिरांचे हात तोडून टाकले असे इतिहास सांगतो. प्रत्यक्षात असा ताजमहाल कदाचित पुन्हा बांधला गेला नसेलही पण आज देशात अनेक ठिकाणी ताजमहालाच्या प्रतिकृती उभ्या राहिल्या आहेत व त्यातील दोन तर खुद्द उत्तरप्रदेशातच आहेत.


उत्तर प्रदेशातील बुलंद शहर येथे उभारली गेलेली ताजमहालाची प्रतिकृती अगदी छोटी व साधी आहे पण त्याचे मुख्य साम्य म्हणजे हाही प्रेमाचे प्रतीक आहे. येथील निवृत्त पोस्टमास्तर फैजल कापरी यांनी त्यांना निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून त्यांच्या पत्त्नीची आठवण म्हणून ही इमारत बांधली आहे.


लखनौ येथील इमामबाडा परिसरात असलेला शहजादी का मकबरा प्रत्यक्षात ताजमहालासारखा दिसत नसला तरी तो भव्य मात्र आहे. तिसरा शहनशहा मोहम्मद अली शाह बहादुर याने त्याची मुलगी झिनत असिया हिच्यासाठी हा मकबरा बांधला तेथे तिच्या अस्थी आहेत.


औरंगाबाद मधील बिबि का मकबरा हा औरंगजेबाचा मुलगा आझमखान याने उभारला आहे मात्र तो त्याने त्याची आई दिलरासबानू बेगम हिची आठवण म्हणून उभारला आहे. हा मकबरा मात्र बराचसा ताजमहालाशी साधर्म्य सांगणारा आहे.


राजस्थानच्या कोटा शहरात जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती उभारल्या गेल्या आहेत. त्यात साहजिकच ताजमहालही आहे. हा मात्र खर्‍या ताजमहालासारखा पण आकाराने लहान आहे.


बंगलोर येथेही २०१५ साली मलेशियन आर्टिस्ट सीकर याने ताजमहालाची प्रतिकृती उभारली असून हा महाल मात्र हुबेहुब ताजमहाल वाटतो.

Leave a Comment