त्रिवेणी संगमाची नगरी अलाहाबाद


भारतात तीन पवित्र यात्रा मानल्या जातात.त्या आहेत काशी, गया आणि प्रयाग. पैकी काशी आणि प्रयाग म्हणजेच अलाहाबाद या उत्तर प्रदेशात आहेत तर गया बिहारमध्ये आहे. प्रयाग याचा अर्थच मुळी संगम असा आहे. प्रयाग येथे हिंदू धर्मियांसाठी पवित्र मानल्या गेलेल्या गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांचा संगम असून त्याला त्रिवेणी संगम असे म्हटले जाते. अलाहाबाद शहराची भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे येथील स्थानिकांनी क्रांतीपासून भक्तीपर्यंत अलाहाबादची अनेक रूपे पाहिलेली आहेत.


त्रिवेणी संगमावर वेणीदान करण्याची प्रथा आहे. या संगमावर स्वच्छ गंगा व काळसर पाण्याची यमुना यांचे मिलन स्पष्टपणे दिसते. तर सरस्वती येथे गुप्त स्वरूपात या नद्यांना मिळते. अलाहाबादला यामुळे तीर्थराज प्रयाग असे म्हटले जाते. येथे माघ महिन्यात मोठी जत्रा भरते तसेच १२ वर्षातून एकदा कुंभमेळाही भरतो.


अलाहाबाद शहरात अनेक अन्य पर्यटनस्थळेही आहेत. त्यातील एक आहे आनंद भवन- भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे हे निवासस्थान आता संग्रहालयात बदलले गेले आहे. म.गांधी व नेहरू यांच्या या घरात अनेकदा बैठका झाल्या होत्या तसेच इंदिरा गांधी यांचे बालपण याच घरात गेले होते. त्यांच्याही अनेक आठवणी येथे जतन करण्यात आल्या आहेत. येथून जवळच कृत्रिम तारांगण आहे व ते पर्यटकांचे मुख्य आकर्षणही आहे.


स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद यांना जेव्हा ब्रिटीश सैनिकांनी घेरले तेव्हा त्यांच्या ताब्यात सापडू नये म्हणून बंदुकीतील शेवटची गोळी आझादांनी स्वतःवर झाडून घेतली ते ठिकाण याच शहरात असून तेथे चंद्रशेखर आझाद पार्क उभारले गेले आहे. या बागेला कंपनी बाग अथवा अल्फ्रेड पार्क या नावानेही ओळखले जाते.


वाहतुकीसाठी बांधलेला नैनी पूल हेही पर्यटकांचेच नव्हे तर स्थानिकांचेही पिकनिक स्थळ आहे. या पुलावरून गंगेचे अति सुंदर दर्शन होतेच पण येथून सूर्यास्तही पाहण्यासारखा असतो. गार हवेमुळे येथे उन्हाळ्यात खूपच गर्दी झालेली असते.

Leave a Comment