रद्द झालेल्या नोटांची मोजदाद अद्याप सुरूच


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील वर्षी ८ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला १ वर्ष पूर्ण होत आहे. पण अद्याप परत आलेल्या नोटा अजूनही भारतीय रिझर्व्ह बँक मोजत असून बँकेची यंत्रणा तपासणी करत आहे. माहिती अधिकाराद्वारे विचारलेल्या प्रश्नावर ही धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.

माहिती अधिकारामध्ये दिलेल्या उत्तरात आरबीआयने म्हटले आहे, की ५०० रुपयांच्या १,१३४ कोटी नोटा ३० सप्टेंबरपर्यंत तर १००० रुपयांच्या ५२४.९० कोटी नोटांची सत्यता तपासली आहे. आरबीआयमध्ये अजूनही कर्मचारी २ शिफ्टमध्ये मशीनद्वारा नोटा मोजत असल्याचे म्हटले आहे. यासाठी ६६ मशीनचा वापर केला जात आहे. दरम्यान विरोधी पक्षाने नोटाबंदीच्या निर्णयाला वर्ष पूर्ण होण्याचा दिवस काळा दिवस म्हणून पाळणार असल्याची घोषणा केली आहे.

Leave a Comment