स्वावलंबनाची सवय


सध्या समाजातले काही श्रीमंत लोक फार अस्वस्थ झाले आहेत. कारण त्यांची पुढची पिढी फार ऐंदी आणि आयत्या पिठावर रेघोट्या मारणारी होत चालली आहे. या लोकांनी लहानपणी वाईट दिवस पाहिलेले आहेत. काही तरी मिळवण्यासाठी संघर्ष केला आहे. एकेक रुपया मिळवताना किती सायास करावे लागतात आणि किती अपमान सहन करावे लागतात याचा दाहक अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यांना आता पैशाची किंमत कळायला लागली आहे. आता ते गडगंंज श्रीमंत आहेत पण जी संपत्ती त्यांनी कष्टाने मिळवली आहे ती त्यांच्या मुलांना मात्र आयती मिळाली आहे. प्रत्येक रुपयामागे काय कष्ट आहेत याची त्यांना कल्पना नसल्याने त्यांना पैशाची फिकीर नाही.

त्यांना संघर्ष करावा लागत नाही. त्यामुळे संघर्षाच्या क्षणाला प्रकट होणारे गुण त्यांच्यात प्रकट होत नाहीत. प्रकट होत नाहीत म्हणून विकसितही होत नाहीत. त्यांना प्रत्येक गोष्ट आयती हवी असते आणि आयती मिळतेही. परिणामी ही मुले मिळमिळीत जीवन जगणारे आणि व्यसनी लक्ष्मीपुत्र म्हणून जीवन जगतात. काही उद्योगपतींनी मात्र या बाबत पथ्य पाळले आहे. आपण कितीही श्रीमंत असलो तरीही आपल्या मुलांना त्यांनी खडतर आयुष्य हे काय असते याचा अनुभव घेण्यास भाग पाडले आहे. मुंबईतल्या एका अब्जाधीश हिरे व्यापार्‍याने आपल्या मुलाला आपले खरे नाव न सांगता हैदराबादेत जाऊन रहायला सांगितले. जाताना केवळ ५०० रुपये दिले. तो मुलगा हलकी सलकी कामे करीत दोन महिने जगला. या काळात त्याला घरातून फोनही आला नाही आणि त्यालाही फोन करण्यास मनाई केली. दोन महिने या मुलाने आपल्या संपन्न जीवनाच्या एकदम विरोधी असलेले जग केवळ पाहिलेच होते असे नाही जगून अनुभवले होते.

हा तर एक प्रयोग झाला पण आपण एरवीही मुलांंना आणि मुलींना आव्हानांना सामोरे जाण्यास सांगतच नाही. दहावीच्या परीक्षेला जाणार्‍या कित्येक मुला मुलींचे पालक त्याचा परीक्षा क्रमांक शोधून द्यायला मदत करतात. त्याच्या आयुष्यात येणार्‍या प्रतिकूल अनुभवाचा त्याला त्रास होता कामा नये म्हणून त्याला मदत करतात. पण ही मदत त्याला दुबळे बनवत असते. दररोजच्या जीवनात त्याला लहान सहान कामाची जबाबदारी दिली पाहिजे. तरच त्याच्यातली संघर्षाची प्रवृत्ती जागी होते आणि वाढते. त्यांचे व्यक्तिमत्त्व सुंदर होते. ती स्मार्ट होतात. नाही तर ही मुले लेचीपेची होतात. मायकेल जॉर्डनच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. त्यासाठी एक कापड विकण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविली गेली पण या एका घटनेतून तो जीवनाचा किती मोठा धडा शिकला ?
(क्रमश:)