जिओ पारसी योजनेबद्दल माहिती आहे?


शेकडो वर्षांपूर्वी इराणमधून झरतुष्ट्राला मानणारे पारशी शरणार्थी म्हणून गुजराथमध्ये आले हे आपल्याला माहिती आहे. हा पारसी समाज भारतीयांमध्ये अगदी दुधात साखर विरघळावी तसा विरघळूनच गेला नाही तर भारताच्या उभारणीत या समाजाने दिलेले योगदान फारच मोठे आहे व ते सर्व क्षेत्रांमध्ये आहे. आज मात्र पारसी समाज संख्येने कमी होत असून भारताच्या सव्वा कोटी लोकसंख्येन अवघे ५७ हजार पारशी आहेत. या पारशी समाजाची लोकसंख्या वाढावी यासाठी त्या समाजात जागृती केली जात आहे व त्यासाठी केंद्र सरकारने जिओ पारसी ही योजना २०१४ साली सुरू केली असून त्यासाठी १० कोटी रूपयांचे सहाय्य दिले आहे.

टाटा ग्रुप, वाडिया ग्रुप, गोदरेज या कंपन्यांचे मालक पारसी आहेत. भारताच्या आर्थिक व औद्योगिक विकासात या लोकांचे मोठे योगदान आहे. बॉलीवूड अभिनेता बोमन इराणी, कोरिओग्राफर श्यामक दावर पारशीच आहेत. इतकेच नव्हे तर भारताचे पहिले फिल्फमार्शल माणेकशा हे पारसीच होते. माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी याच समाजाचे. २०११ च्या जनगणनेनुसार आज ५७ हजार पारशी आहेत. दरवर्षी त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाण ८०० आहे तर नवीन जन्माचे प्रमाण आहे अवघे २००.


जिओ पारसी येाजनेत पाच वर्षात २२० मुलांचा जन्म असे लक्ष्य ठेवले गेले आहे.२०१४ साली सुरू झालेल्या या योजनेत तीन वर्षात ११० मुलांचे जन्म झाले आहेत तर आणखी १५ बालके जन्माला येण्याच्या स्थितीत आहेत. पारसी समाजात उशीरा लग्न किवा अविवाहित राहण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच ज्यांना एक मुल आहे ते दुसरे मूल जन्मास घालण्यास तयार नाहीत यामुळे त्यांची संख्या कमी होते आहे. पारसी लोकांची मानसिकता बदलणे हे या योजनेचे मुख्य ध्येय आहे व पारसी समाजातील समाजसेवक हे काम करत आहेत.

पारसी समाजात आंतरधर्मिय विवाहातून मुले जन्माला आली तर त्यांना पारसी समजले जात नाही. अशी आज हजारो मुले आहेतही पण त्यांना पारसी समाज मान्यता देत नसल्याने त्यांना पारसी म्हटले जात नाही असे या समाजातील विचारवंतांचे म्हणणे आहे.

Leave a Comment